Nagpur News : दिवाळीच्या सणासाठी कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी नागपुरात आलेल्या शिक्षक दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील रेवतीनगर परिसरातील राहत्या घरात पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आले. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मनीष प्रल्हाद गणवीर (वय ३८) आणि सोनाली मनीष गणवीर (वय ३५) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीष आणि सोनाली हे दोघेही गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील लॉयड्स मेटल्स कंपनीद्वारे संचालित लॉयड्स राज विद्या निकेतन शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून त्यांनी या शाळेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून काम सुरू केले होते. याच वर्षी शाळा व्यवस्थापनाने मनीष यांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून पदोन्नतीही दिली होती.
मनीष हे मूळचे नागपूरचे रहिवासी होते, तर सोनाली या गडचिरोलीजवळील नवेगाव (मुरखळा) येथील रहिवासी होत्या. दोघांचेही यापूर्वी विवाह झाले होते. मात्र, पहिल्या वैवाहिक संबंधातून घटस्फोट घेतल्यानंतर दोघांची एकाच शाळेत काम करताना ओळख झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर विवाहात झाले. ३१ ऑगस्ट रोजी दोघांनी न्यायालयीन पद्धतीने विवाह केला होता. त्यानंतर ते नागपुरातील रेवतीनगर परिसरात एकत्र राहत होते.
नातेवाईक घरी पोहोचले अन् धक्कादायक प्रकार उघड
दिवाळीनिमित्त गणवीर दाम्पत्य नागपुरात आले होते. रविवारी सकाळी नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी घरी गेले असता घराचा दरवाजा बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर घरातील परिस्थिती समोर आल्यानंतर दोघेही मृतावस्थेत आढळले. प्राथमिक माहितीनुसार, घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले आहे. या घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
मृत्यूमागील कारण अद्याप गुलदस्त्यात
शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वीच विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्याने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या मृत्यूमागे नेमकी कोणती परिस्थिती होती, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती, नातेवाईकांचे जबाब आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे गणवीर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून रेवतीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.