Eknath shinde, Girish mahjan  Sarkarnama
महाराष्ट्र

Maratha Reservation: गिरीश महाजनांची मोठी अपडेट, मुख्यमंत्री सोमवारी मराठा आरक्षणप्रश्नी सभागृहात करणार महत्त्वाची घोषणा

Sachin Waghmare

Chhatrapati Sambhajinagar : आंतरवाली सराटी येथे रविवारी मराठा समाजबांधवांची बैठक मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आहे. त्या बैठकीपूर्वी सरकारने केलेल्या कामाची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांनंतर शनिवारी रात्री सरकारच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री संदीपान भूमरे यांनी त्यांची भेट घेतली. मीडिया समोरच तिघांमध्ये चर्चा झाली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या संबंधाने मोठी अपडेट दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) सोमवारी सभागृहात मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती देणार आहेत. त्यामुळे येत्या काळात आंदोलनाचा निर्णय घेऊ नये. 24 तारखेच्या अल्टिमेटमवर विचार करा, अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. त्यावर जरांगे पाटलांनी रविवारच्या समाजाच्या बैठकीत चर्चा करु, असे स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे पाटलांवर (Manoj Jarange) उपचार सुरु आहेत. त्या ठिकाणी जाऊन सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. शिष्टमंडळात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचा समावेश होता. मंत्री गिरीश महाजन म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणप्रश्नी सकारात्मक आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती त्यांना दिली आहे. मुख्यमंत्री सोमवारी आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय जाहीर करु शकतात, असे दिसून येते. महत्त्वाचं म्हणजे २४ डिसेंबरच्या तारखेच्या बाबतीत जरांगे पाटलांनी विचार करावा, अशी मागणी महाजन यांनी केली.

विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचा पर्याय त्यासोबतच येत्या काळात मागासवर्ग आयोगाकडून अहवाल घेऊन आणि विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा प्रश्न सोडवता येईल, असेही गिरीश महाजन बोलताना म्हणाले. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही या पद्धतीने आरक्षण देण्याचा प्रयत्न असणार आहे. आतापर्यंत 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, अशी माहिती दिल्यानंतर जरांगेंनी समाधान व्यक्त केले. त्याशिवाय उपोषण सोडताना कागदावर जे लिहून दिलेलं होतं, त्याप्रमाणेच आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी जरांगेंनी केली. त्याला महाजनांनी होकार दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्द पाळतील'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनप्रसंगी उपोषण सोडताना मराठा समाजाला दिलेला शब्द पाळणार, असे ठामपणे सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास असल्याचे यावेळी जरांगे पाटलांनी सांगत सरकारकडून सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

रविवारच्या बैठकीनंतर स्पष्ट करणार समाजाची भूमिका

दरम्यान, आंतरवाली सराटी येथे रविवारी मराठा समाजबांधवांची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये 24 तारखेनंतरच्या आंदोलनाची रुपरेषा ठरणार आहे. मात्र, सरकारला आणखी वेळ द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. त्यावर काय निर्णय होतो, हे बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.

(Edited by- Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT