Panji News : राज्याचे पर्यावरण, कायदा आणि बंदर कप्तान खात्याचे मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सिक्वेरांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी बुधवारी (ता.20 ऑगस्ट) सायंकाळी चार वाजता मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे.
आलेक्स सिक्वेरा यांनी मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे’, असे त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. सिक्वेरा यांनी मंत्रिपदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. कायदा, पर्यावरण आणि बंदर कप्तान खात्यात उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला, असे सिक्वेरांनी म्हटले. त्यांनी मंत्रिमंडळातील सहकारी, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आलेक्स सिक्वेरा यांची प्रकृती ठिक नाही, अलिकडेच त्यांच्यावर दिल्लीत उपचार करण्यात आले. मुख्यमंत्री सावंत दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी सिक्वेरा यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी अलिकडेच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनासही हजेरी लावली होती.
अधिवेशनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ग्रीन सेस बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले होते. दरम्यान, पक्षाबाबत त्यांना कोणतीही समस्या नसून, वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
19 नोव्हेंबर 2023 रोजी नीलेश काब्राल यांचा राजीनामा घेऊन सिक्वेरा यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये आलेल्या आठ आमदारांपैकी मंत्रिपद मिळण्याचा पहिला मान आलेक्स सिक्वेरा यांना मिळाला होता. 22 महिने त्यांनी मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.
14 सप्टेंबर 2022 रोजी आलेक्स सिक्वेरा यांच्यासह दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या गोवा मंत्रिमंडळाच्या फेरविस्तारावर शिक्कामोर्तब झाला असून, गुरुवारी दोन नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. रमेश तवडकर गुरुवारी सकाळी विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा देतील. यानंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह तवडकर मंत्रीपदाची शपथ घेतील, अशी माहिती खुद्द रमेश तवडकरांनी माध्यमांना दिली.
दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जीएसटी कौन्सिलच्या बैठकीसाठी बुधवारी (ता.20 ऑगस्ट) दिल्लीत असून, बैठकीनंतर ते वरिष्ठांशी भेटीगाठी घेतील. यावेळी फेरविस्ताराची अंतिम चर्चा देखील होईल अशी भाजप सूत्रांनी माहिती दिली आहे. गुरुवारी दुपारपर्यंत नव्या मंत्र्यांचा शपथविधी अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.