Goa Assembly Sarkarnama
महाराष्ट्र

Goa Cabinet Reshuffle : ... म्हणून गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना पुन्हा लांबणीवर!

Goa Government Delays Cabinet Reshuffle: भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी गोव्यातील मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा मुद्दा तूर्त बाजूला ठेवल्याचे दिसत आहे.

Mayur Ratnaparkhe

Goa Political News : निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात सध्या जोरदार घडामोडी सुरू आहेत. भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली असली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार व शिवसेना-ठाकरे गटाने चालविलेल्या शह-काटशहाच्या घडामोडींनी राजकीय वातावरण तापलेलं आहे.

दररोज नवनवीन घटनांमुळे संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्‍ट्राकडे लागले आहे. त्यात भाजप नेतृत्वाला मागे राहून चालणार नाही, हे समजून आल्याने पक्षश्रेष्ठींनी गोव्यातील मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा मुद्दा तूर्त बाजूला ठेवल्याचे दिसत आहे.

परिणामी गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतरच (Vidhan Sabha Election ) होऊ शकते. पक्षश्रेष्ठी महाराष्ट्राच्या निवडणुकीतच गर्क दिसत आहेत. ‘‘गोवा मंत्रिमंडळातील फेरबदल हा राज्यासाठी जरी छोटा विषय वाटत असला तरी पक्षश्रेष्ठींना त्याही विषयावर साधकबाधक चर्चा करावयाची आहे.

कदाचित त्यांच्या मनात काही मोठे फेरबदल करायचे असू शकतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतरच ते काय आहे ते होऊ शकते’’, अशी माहिती पक्षाच्या एका उच्चपदस्थाने ‘गोमन्तक’ला दिली.

मंत्रिमंडळात फेरबदल गणेश चतुर्थीनंतर होतील असे सूतोवाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच केले होते. त्यांनी दिलेल्या काही मुलाखतींमधून मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची वेळ आली आहे हे स्पष्ट झाले होते.

पक्षश्रेष्ठींशी सल्लामसलत करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल, असे ते बोलले होते. मंत्रिमंडळाच्या फेरबदलावरून विद्यमान मंत्र्यांमध्ये चलबिचल आहे व काही ताकदवान मंत्र्यांमध्ये तर अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेले काही दिवस काही मंत्र्यांनी दिल्लीत लॉबिंगही चालविले आहे.

‘‘महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतरच आता गोव्यात बदल होतील हे पक्षश्रेष्ठींनी त्यांना भेटायला गेलेल्या गोव्यातील मंत्र्यांकडे स्पष्‍ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील धाकधूक पुढच्या एका महिन्यासाठी तरी संपली आहे,’’ असेही या सूत्रांनी सांगून कोण पक्षश्रेष्ठी व त्यांना कोण-कोण भेटले आहेत, हे सांगण्यास मात्र नकार दिला.

दिगंबरनी वाढविली मुख्‍यमंत्र्यांची डोकेदुखी -

दिगंबर कामत व संकल्प आमोणकर यांना मंत्रिमंडळात प्रवेश करण्याची आस लागून राहिली आहे. परंतु माजी मुख्यमंत्री कामत यांना मंत्रिमंडळात स्‍थान दिले तर त्यांना दुसऱ्या क्रमांकाची खाती द्यावी लागतील व त्यासाठी मुख्यमंत्र्यांना स्वतःकडची काही खाती सोडावी लागतील किंवा अन्य ताकदवान मंत्र्यांकडील खाती काढून घ्यावी लागतील. काही मंत्र्यांच्या उचापतींवर मुख्यमंत्री नाराज आहेत. काही मंत्र्यांमध्‍ये वाक्‌युद्धही सुरू आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाची त्यास किनार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT