Gopichand Padalkar Vs P K Atre: भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर हे आपल्या वाचाळ विधानांसाठी ओळखले जातात. नुकतेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत अश्लाघ्य पद्धतीची टीका केली आहे. यावरुन आता पडळकर यांच्यावर केवळ राष्ट्रवादीकडूनच नव्हे तर सर्वच स्तरातून कठोर टीका व्हायला लागली आहे. पडळकर यांनी यापूर्वी देखील शरद पवार, अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर अशाच पद्धतीनं खालच्या स्तरावर जाऊन भाष्य केलं आहे. त्यामुळं भाजपकडून त्यांना या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं जातंय का? असा प्रश्न सर्वसामान्य लोक सोशल मीडियावर विचारु लागले आहेत.
पण यानिमित्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत अशाच पद्धतीची टीका पत्रकार, लेखक आणि राजकारणी प्रल्हाद केशव अत्रे यांनी केली होती. पण चव्हाणांनी त्यांच्या टीकेवर स्पष्टीकरण दिल्यानंतर अत्रेंनी माफीही मागितली होती. हा किस्सा नेमका काय होता? हे जाणून घेऊयात.
जयंत पाटील यांनी आपल्यावर केलेल्या टीकेचा दाखला देताना पडळकर म्हणाले, "गोपिचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? यामधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा, असं ते म्हणाले. पण अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी औलाद गोपिचंद पडळकर नाही, माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारख्याची औलाद नाही. तू राजाराम पाटलांनी***वाटत नाही"
पडळकरांच्या या विधानावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, "जयंत पाटलांचे वडील राजाराम पाटील आणि त्यांच्या मातोश्रीबद्दल बोलण्यात आलं हे अत्यंत खेदजनक आणि आपत्तीजनक आहे. पण माझा प्रश्न सुसंस्कृत आणि संस्काराबद्दल कायम भाष्य करणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाला हे मान्य आहे का? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. तुम्हालाच बोलता येतं असं समजू नका. म्हणून आमची अपेक्षा आहे की आपण जाहीररित्या या विधानाबद्दल नापसंती व्यक्त करुन माफी मागावी"
संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची निवड करण्यात आली. त्यावेळी आपल्या सडेतोड लेखणीसाठी ओळखले जाणारे संपादक प्र. के. अत्रे यांनी मराठा दैनिकात ‘निपुत्रिक यशवंतराव चव्हाणांच्या हाती महाराष्ट्राची धुरा’ असं हेडिंग करुन यशवंतरावांवर जहरी टीका केली होती. या हेडिंगची त्यावेळी बरीच चर्चा झाली. या मथळ्याखालील लेख प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी यशवंतराव चव्हाण यांनी अत्रेंना फोन केला आणि आपल्याला मुलबाळ का नाही याचं स्पष्टीकरण दिलं. त्यांनी अत्रेंना अत्यंत शांतपणे सांगितलं की, “अत्रे साहेब मी निपुत्रिक नाही. चले जावं चळवळीत इंग्रजांच्या विरोधात लढा देत असताना इंग्रजांनी मला पकडण्यासाठी माझ्या घरी धाड टाकली त्यावेळी माझी पत्नी वेणू ही गरोदर होती. मी सापडत नसल्यानं रागानं इंग्रजांच्या सैनिकांनी वेणूताईच्या पोटावर लाथ मारली. त्यात वेणूताई यांचा गर्भपात झाला आणि त्यांच्या गर्भाशयाला कायमची हानी झाली. त्यामुळं पुन्हा मूल होण्यास अडचण तयार झाली. आता यामध्ये माझी आणि वेणूताई यांची काय चूक आहे?”
यशवंतरावांनी अत्यंत शांतपणे आणि कुठल्याही प्रकारे प्रत्युत्तर म्हणून खालच्या पातळीवर न जाता अत्रेंना त्यांची चूक लक्षात आणून दिली. अत्रेंनाही हे ऐकल्यानंतर आपल्या टीकेचा पश्चाताप झाला आणि आपली चूक सुधारण्यासाठी त्यांनी दुसऱ्याच दिवशी पुन्हा मराठा दैनिकात यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल जे काही विधान केले त्याबद्दल माफी मागितली. इतकंच नव्हे तर अत्रे या चव्हाण जोडप्याची प्रत्यक्ष माफी मागण्यासाठी त्यांच्या घरी गेले आणि पाय धरुन त्यांची माफी मागितली. या घटनेनंतर यशवंतराव आणि त्यांच्या पत्नी वेणुताई या दोघांनीही अजाणतेपणातून अत्रेंची चूक झाली असल्यानं त्यांना तात्काळ माफ केलं आणि उलट यानिमित्त तुम्हाला आमच्या घरी यायला मिळालं असं वेणुताई त्यांना म्हणाल्या.
असा हा किस्सा घडला होता. पण यातून त्यावेळचं राजकारण आणि राजकारणी हे कसे होते? एखाद्यावर वैयक्तिक टीका-टिप्पणी करताना आणि त्याला उत्तरं देताना त्यांच्या राजकारणाचा दर्जा कसा होता? हे लक्षात येतं. पण आजच्या राजकारणात हे आता दुरापास्त झालं असून एकमेकांवर घालूनपाडून टीका करणं त्यासाठी शिवीगाळ करणं, हिंसक आणि असंसदीय शब्दांचा वापर करणं, चिथावणीखोर विधानं करणं हे आता सर्सास पाहायला मिळत आहे. त्यामुळं आजच्या राजकारणाची आणि पूर्वीच्या राजकारणाची कायम तुलना केली जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.