Gopinath Munde  Sarkarnama
महाराष्ट्र

Prithviraj Chavan: गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते? माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट; ‘नागपूरच्या दोन नेत्यां’ची भीती

Prithviraj Chavan Statement Gopinath Munde Congress Entry : गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक होते, असा मोठा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे. गोपीनाथ मुंडे हे एका टप्प्यावर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक होते. त्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यासोबत त्यांच्या गुप्त बैठका झाल्या होत्या, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी साम टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार,गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी केंद्रात मंत्रीपद देण्याची अट ठेवली होती, असेही चव्हाण यांनी सांगितले. भाजपमध्ये राहिल्यास नागपूरमधील दोन प्रभावशाली नेते आपल्याला भविष्यात निवडून येऊ देणार नाहीत, अशी भीती मुंडे यांनी व्यक्त केली होती, असा दावा त्यांनी केला.

मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका?

मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात काही बैठका झाल्या होत्या. या बैठकांमध्ये मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेसकडून मुंडेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील?

गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या प्रस्तावाला तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची संमती होती, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे मुंडे काँग्रेसमध्ये जाण्याबाबत त्यावेळी राजकीय पातळीवर गंभीर चर्चा सुरू होती, असे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. मात्र, या प्रवेशाच्या मार्गात केंद्रातील निर्णयामुळे अडथळा निर्माण झाला.

मनमोहन सिंगांच्या भूमिकेमुळे प्रवेश रखडला?

पृथ्वीराज चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्षातील विद्यमान खासदाराला काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन थेट केंद्रीय मंत्रिपद देणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका घेतली.

यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेस प्रवेश प्रत्यक्षात होऊ शकला नाही. चव्हाण यांनी सांगितलेल्या या घडामोडींमुळे मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक वेगळा आणि आतापर्यंत फारसा चर्चेत नसलेला पैलू समोर आला आहे.

‘त्या वेळी थेट मनमोहन सिंगांशी बोलायला हवे होते’

या संपूर्ण प्रकरणाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःची एक खंतही व्यक्त केली. या विषयावर आपण तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी थेट चर्चा करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्याकडे गेलो, याचा आजही पश्चाताप होत असल्याचे त्यांनी म्हटले.

त्यामुळे जर त्यावेळी वेगळा निर्णय झाला असता, तर गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय प्रवासाला वेगळे वळण मिळाले असते का,असा प्रश्न या दाव्यानंतर उपस्थित होत आहे.

‘नागपूरच्या दोन नेत्यांमुळे’ काय होतं मुंडेंना भीती?

गोपीनाथ मुंडे यांनी ज्या ‘नागपूरच्या दोन नेत्यां’चा उल्लेख केला होता, त्यांची नावे पृथ्वीराज चव्हाण यांनी या माहितीत स्पष्ट केली नाहीत. मात्र, भाजपमधील अंतर्गत राजकीय समीकरणांमुळे आपल्याला भविष्यात निवडणूक जिंकणे कठीण होईल, अशी भीती मुंडेंना होती, असा दावा त्यांनी केला.

यामुळे मुंडे आणि भाजपमधील तत्कालीन अंतर्गत राजकारणाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे हे भाजपच्या विस्तारातील महत्त्वाचे नेते मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या संभाव्यतेबाबतचा हा दावा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशासंदर्भातील या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषतः मुंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी कथितरित्या ठेवलेली मंत्रीपदाची अट आणि ‘नागपूरच्या दोन नेत्यां’बाबत व्यक्त केलेली भीती याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT