

कोलकाता: तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील कृष्णनगर सर्किट हाऊसमध्ये मुक्कामासाठी गेलेल्या महुआ मोईत्रा यांना चेक-इन केल्यानंतर काही तासांतच रात्रीच्या वेळी खोली खाली करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कृष्णनगर सर्किट हाऊसमध्ये पोहोचल्या. त्यांना एक खोली देण्यात आली. रात्री सुमारे ९ वाजून २० मिनिटांनी त्यांना जेवणही देण्यात आले. मात्र, त्यानंतर अवघ्या काही वेळातच त्यांना खोली रिकामी करण्यास सांगण्यात आले.
महुआ मोईत्रा यांनी सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओच्या माध्यमातून या घटनेची माहिती दिली. त्यांच्या दाव्यानुसार, रात्री सुमारे १० वाजता त्यांना खोली खाली करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळातच खोली रिकामी करण्याबाबत औपचारिक आदेशही देण्यात आला.
महुआ मोईत्रा यांनी सांगितले की, खोली सोडण्यासाठी त्यांना वारंवार फोन आणि मेसेज केले जात होते. मात्र, रात्रीच्या वेळी अचानक खोली खाली करण्यास त्यांनी नकार दिला.
महुआ मोईत्रा यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सर्किट हाऊसच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाल्याचा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, बाहेर काही लोकांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या जात होत्या. या परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी आपण दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले. परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण तिथेच थांबणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
खोली आधी त्यांना अधिकृतपणे देण्यात आली होती. जेवणही देण्यात आले आणि त्यानंतर रात्री अचानक खोली रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे अशा प्रकारे रात्रीच्या वेळी आपण सर्किट हाऊस सोडणार नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. खोली रिकामी करण्यासाठी दबाव वाढल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा हवाला देण्यात आला, असे मोईआ यांनी सांगितले.
१४ ऑगस्टच्या संध्याकाळपासून सर्किट हाऊस स्वच्छता आणि देखभालीच्या कामासाठी उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले होते. याच कारणामुळे खोली खाली करण्यास सांगण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आल्याचे मोईत्रा यांनी सांगितले.
मात्र, मोईत्रा यांनी या कारणावरही प्रश्न उपस्थित केले. खोली आणि बाथरूम दाखवत त्यांनी ते पूर्णपणे व्यवस्थित असल्याचे सांगितले. जर सर्किट हाऊस बंद ठेवायचे होते, तर सुरुवातीला खोली का देण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महुआ मोईत्रा यांनी सुरक्षा व्यवस्थेचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, कलकत्ता उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला त्यांना सुरक्षा देण्यास सांगितले होते. मात्र, त्याच जिल्हा प्रशासनाकडून आता रात्रीच्या वेळी खोली खाली करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी नेजारत डेप्युटी कलेक्टरकडून खोली खाली करण्याचा आदेश मिळाल्याचेही सांगितले.
या संपूर्ण प्रकारावर महुआ मोईत्रा यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याचा सल्ला दिला होता आणि त्या त्याच पद्धतीने परिस्थितीचा सामना करत आहेत. दरम्यान, महुआ मोईत्रा या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असून पश्चिम बंगालच्या राजकारणात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. कृष्णनगर सर्किट हाऊसमधील या कथित प्रकारामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.