मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या उमेदवारीचा गोंधळ ठेवलेल्या काँग्रेस नेत्यांमधील चढाओढीचे राजकारण, ठाकरे सरकारमधील मित्रपक्षातील बेदिली आणि राज्यपालांकरवी भाजपने खेळी केल्याने विधीमंडळाच्या या अधिवेशनात (Assembly Winter Session) अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. तरीही, राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक घेता येईल का, याची चाचपणी करीत निवडणूक घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. या साऱ्या गोंधळात विधानसभेला डिसेंबर 2021 अखेर अध्यक्ष मिळण्याची आशा खोटी ठरली आहे.
ही निवडणूक आवाजी मतदानाने होण्यासाठी विधीमंडळाने नियमात बदल केला. या बदलांना राज्यापालांची मान्यता आणि निवडणूक घेण्याचे सूचना राजभवनातून येणे अपेक्षित होते. मात्र त्यावर राज्यपालांनी काही कायदेशीर प्रश्न उपस्थित केले. त्याचे निरसन करण्यासाठी राज्य सरकारने तीन पत्रे पाठवली आहेत. तरीही राज्यपालांकडून निवडणुकीसाठी होकार येईलच, याची खात्री सरकारला नाही. त्यामुळे या परवानगीशिवाय निवडणूक घेता येईल का याची चाचपणी सुरू आहे.
विधीमंडळाच्या अधिवेशनातील सोमवारचे काम संपण्यास काही तासांचा अवधी राहिला आहे. तोपर्यंत ना राज्यपालांकडून कार्यवाही झाली; ना काँग्रेस नेतृत्वाकडून अन्य कोणते प्रयत्न झाले. परंतु, तज्ज्ञांशी चर्चा करून राज्यपालांच्या परवानगीची गरज नसल्यास आजच निवडणूक घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. तरीही अधिवेशनाच्या कामकाजाचे काही तासच शिल्लक असताना निवडणुकीची प्रक्रिया करण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
अधिवेशनाच्या शेवटच्या दोन दिवसांत विधानसभा अध्यक्ष निवडण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात निर्णय व्हावा म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेतली. तेव्हा, प्रस्तावातील कायदेशीर बाबी तपासणून निर्णय कळवू, असे सांगून राज्यपालांनी नेत्यांना सांगितले. त्यामुळे अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी होण्याची शक्यता होती. काँग्रेसने तसे जाहीरही केले होते. त्यामुळे या निवडणुकीसह उमेदवाराच्या नावाकडे लक्ष लागले असतानाच या निवडणुकीबाबत राज्यपालांना पाठविलेल्या पत्रावर सोमवारीपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत सही झालेली नाही. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक होणार नसल्याची चर्चा सोमवारी सकाळपासूनच होती. तरीही निवडणूक होणार असल्याचे सांगत, काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीची तयारी ठेवल्याचे दाखविले.
पटोले म्हणाले, "विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी केलेली नाही. मात्र, आपल्या सोयीच्या कार्यक्रमांना वेळ देणारे राज्यपाल मात्र महत्त्वाच्या पदाच्या निवडणुकीकडे राजकारणातून दुर्लक्ष करीत आहेत. ही निवडणूक होऊ नये, याकरिता भापजने प्रयत्न केले होते. भाजप नेत्यांच्या घुसखोरीमुळे राज्यपाल निर्णय घेत नाहीत. त्यावर सोमवारी दुपारी पुन्हा बैठक घेऊन दिशा ठरविली जाईल."
राज्यपालांमुळे ही निवडणूक थांबल्याचे सांगणाऱ्या काँग्रेसमधील उमेदवाराचा गोंधळ अजूनही संपलेला नाही. हायकमांड उमेदवार ठरविणार असल्याचे जाहीर करण्यात आले. निवडणुकीचा दिवस आला तरीही अध्यक्षपदाचा काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव एकाही नेत्याकडे नव्हते. नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे या अध्यक्षपदाच्या शर्यतीतील नेत्यांची नावे केवळ माध्यमांत येत राहिली. या साऱ्या परिस्थितीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीच अध्यक्ष म्हणून सभागृहात काम पाहिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.