Sameer Gaikwad death news Sarkarnama
महाराष्ट्र

मोठी बातमी : गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपीचा संशयास्पद मृत्यू ; नेमकं काय घडलं?

Govind Pansare Murder Case Accused Dies : गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. वाचा सविस्तर अपडेट.

Rashmi Mane

निवडणुकीच्या धामधुमीत वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतानाच गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र समीर गायकवाडचा संशयास्पद मृत्यू झाला की नैसर्गिक रित्या या वरून अनेक तर्कविर्तक बांधण्यात येत आहेत.

गेल्या 10 वर्षापासून सुरु असलेल्या खटल्याचा संशयित आरोपीचा अचानक मृत्यु झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. सांगली येथील त्याच्या राहत्या घरातच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.

16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूर येथे ज्येष्ठ पुरोगामी नेते आणि विचारवंत गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गोविंद पानसरे यांचा चार दिवसांनी, 20 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. उमा पानसरे या हल्ल्यातून बचावल्या, मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.

या हत्येच्या तपासात तब्बल सात महिन्यांनंतर, 16 सप्टेंबर 2015 रोजी सांगली येथून समीर गायकवाडला अटक करण्यात आली. विशेष तपास पथकाने ही कारवाई केली होती. त्या वेळी गायकवाडचे वय अवघे 32 वर्षे होते. तो सनातन संस्थेचा साधक असल्याचे सांगितले जात होते. तपास यंत्रणांनी त्याच्यावर पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप केला.

या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे गेला, तसतसे अनेक वळणे समोर आली. गायकवाडकडून मोबाईल जप्त करण्यात आला होता आणि काही साक्षीदारांनी तो ओळखल्याचा दावा केला होता. मात्र, ठोस आणि निर्णायक पुरावा मिळण्यात तपास यंत्रणांना अडचणी आल्याचे वारंवार समोर आले. ब्रेन मॅपिंग आणि लाई डिटेक्टर चाचणीसाठी पोलिसांनी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली.

2017 मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने गायकवाडला सशर्त जामीन मंजूर केला. त्याला महाराष्ट्राबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती आणि नियमित पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घालण्यात आली होती. गायकवाड प्रत्येक रविवारी सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात हजेरी देत होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली आहे. पुढे 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची जामीन रद्द करण्याची मागणी नाकारली आणि या प्रकरणातील पुरावे कमकुवत असल्याचे निरीक्षण नोंदवले.

सध्या हा खटला सुरू असतानाच, फॉरेन्सिक अहवाल परदेशातून मागवण्यात आले होते. त्या अहवालांची प्रतीक्षा सुरू असतानाच समीर गायकवाडच्या मृत्यूची बातमी आली आहे. त्यामुळे पानसरे हत्या प्रकरणाचे पुढे काय होणार, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT