Gurukunj Mozari Sarkarnama
महाराष्ट्र

Gurukunj Mozari: राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवात ‘तरुणांच्या आंदोलनांना अराजकता’ म्हणल्याने वाद; गुरुदेव सेवा मंडळ स्पष्टीकरण, ‘निवेदनाचा RSS सोबत संबंध नाही’

Gurudev Seva Mandal RSS Connection Clarification: युवकांच्या आंदोलनांना अराजकता संबोधल्याच्या आरोपानंतर गुरुदेव सेवा मंडळाने स्पष्टीकरण दिले. निवेदनाचा RSS शी संबंध नसून तरुणांच्या भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे गोपाळ कडू म्हणाले.

सरकारनामा ब्यूरो

Gurukunj Mozari News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील गुरुकुंजमध्ये आयोजित पुण्यतिथी महोत्सवातील निवेदनावरून निर्माण झालेल्या वादावर आता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाची भूमिका समोर आली आहे. तरुणांच्या आंदोलनांना ‘अराजकता’ संबोधल्याचा आरोप झाल्यानंतर मंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. तरुणांच्या भावना दुखावण्याचा किंवा त्यांच्या आंदोलनावर बोट ठेवण्याचा संस्थेचा कोणताही हेतू नव्हता.

निवेदनातील एक मुद्दा तोडून व्हायरल करण्यात आल्याचे मंडळाचे प्रचारक गोपाळ कडू यांनी स्पष्ट केले. तसेच, श्रद्धांजलीपर निवेदनाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवात देशातील आणि राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य करण्यात आले होते. यामध्ये बांगलादेशातील हिंसाचार, राज्यातील कोरडा दुष्काळ, नेपाळमधील जलप्रलय आणि तरुणांनी केलेल्या आंदोलनांचाही उल्लेख होता. मात्र, आंदोलनांसंदर्भातील निवेदनात ‘अराजकता’ हा शब्द वापरल्याचा दावा झाल्यानंतर युवकांमध्ये नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर मंडळाने आपली बाजू मांडली आहे.

‘निवेदनातील एकच मुद्दा तोडून व्हायरल केला’

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक गोपाळ कडू यांनी सांगितले की, श्रद्धांजलीपूर्वीच्या निवेदनामध्ये देशातील आणि जगातील महत्त्वाच्या घडामोडींवर भाष्य केले जाते. यंदाही विविध घटनांचा आढावा घेताना तरुणांच्या आंदोलनांचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, त्या निवेदनातील तेवढाच मुद्दा तोडून व्हायरल करण्यात आला.

तरुणांच्या भावना दुखावण्याचा किंवा त्यांच्या आंदोलनावर बोट ठेवण्याचा संस्थेचा कोणताही मानस नाही. आंदोलनं शांततेच्या मार्गाने व्हावीत आणि सरकारने घालून दिलेल्या नियमांच्या चौकटीत व्हावीत, एवढीच संस्थेची भूमिका आहे. आंदोलनांमुळे राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान होऊ नये, ही भावना व्यक्त करण्यात आली होती, असे कडू यांनी स्पष्ट केले.

‘अराजकता’ या शब्दाचा अर्थ अव्यवस्था निर्माण करणे असा आहे. त्यामुळे या शब्दाचा उल्लेख आंदोलन करणाऱ्या तरुणांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आलेला नव्हता, असेही त्यांनी सांगितले.

नितेश कराळे यांचा राजकीय विचार पेरल्याचा आरोप

दरम्यान, या निवेदनावर आक्षेप घेत शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नितेश कराळे यांनी संस्थेवर गंभीर आरोप केले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना बाजूला सारून पुण्यतिथी महोत्सवाच्या व्यासपीठावरून एका विशिष्ट पक्षाचे आणि RSS चे विचार अनुयायांमध्ये पेरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

कराळे यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सर्वधर्मसमभावाचा विचार समाजात रुजवला. यापूर्वी सामुदायिक प्रार्थनेवेळी महाराजांच्या छायाचित्राशेजारी सर्व धर्मांची प्रतीके लावली जात होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून ती दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला.

यंदाच्या पुण्यतिथी महोत्सवात नीट पेपरफुटीविरोधात तरुणांनी केलेल्या आंदोलनाला ‘अराजकता’ असे संबोधण्यात आल्याचा आक्षेपही कराळे यांनी घेतला होता. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, अशा परिस्थितीत भविष्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून केलेले आंदोलन चुकीचे कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

राष्ट्रसंतांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला आणि अन्यायाविरोधात आवाज उठवला. त्यामुळे त्यांच्या विचारमंचावरून सरकारच्या चुकीच्या धोरणांवरही टीका झाली पाहिजे. हे व्यासपीठ राजकीय पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संस्था मधून आलेल्या रेडिमेड स्क्रिप्टमधून बहुजन सर्वसामान्य लोकांची माथी भडकवणारे वक्तव्य या स्क्रिप्टमधून सांगण्यात येऊ नये. अशी अपेक्षा कराळे यांनी व्यक्त केली होती.

‘RSS चा निवेदनाशी संबंध नाही’; मंडळाचे स्पष्टीकरण

नितेश कराळे यांच्या आरोपांवर बोलताना गोपाळ कडू यांनी व्यासपीठाची संकल्पना आणि विषय दरवर्षी बदलत असल्याचे सांगितले. कराळे यांनी ज्या वर्षी व्यासपीठ पाहिले, त्या वेळी सर्वधर्मसमभाव ही संकल्पना होती. मात्र, मागील वर्षी वेगळी आणि यंदा वेगळी संकल्पना होती. त्यामुळे प्रत्येक वर्षीच्या कार्यक्रमाची तुलना करून आरोप करणे योग्य नसल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्रद्धांजलीपूर्वीच्या निवेदनाशी कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT