Payal Zambre Death Case: पायल झांबरे आत्महत्या प्रकरणाचा A टू Z घटनाक्रम! ५० तोळे सोने, २५ लाखांची रोकड, मुलगी झाल्यानंतर छळ; आतापर्यंत काय घडलं?

Payal Zambre Suicide Case | Dowry Harassment Allegations: पुण्यातील पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात पतीसह सासू-सासऱ्यांना अटक झाली आहे. ५० तोळे सोने, २५ लाख रुपये आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
Payal Zambre Suicide Case
Payal Zambre Suicide CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune Crime News : मुलगी झाली म्हणून अपमान, लग्नात ५० तोळे सोने आणि २५ लाख रुपये रोख दिल्यानंतरही पैशांसाठी सुरू असलेला तगादा, माहेरच्या जमिनीची मागणी आणि दिवाळीत आणखी पाच तोळे सोने आणण्यासाठी दबाव... या कथित छळाला कंटाळून पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक बाळासाहेब झांबरे यांच्या सुनेने आत्महत्या केल्याच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे. मुकुंदनगर येथील झांबरे पॅलेसमध्ये पायल अक्षय झांबरे (वय ३४) यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. आत्महत्येपूर्वी त्यांनी भावाला 'माझ्या आत्महत्येला माझी सासू जबाबदार आहे,' असा संदेश पाठविल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणात पती अक्षय झांबरे, सासू मंगल झांबरे, सासरे अरविंद झांबरे आणि नणंद अक्षता झांबरे-निम्हण यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अक्षय याला सुरुवातीला अटक करण्यात आली. त्यानंतर सासू मंगल आणि सासरे अरविंद झांबरे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. नणंदेची भूमिका तपासली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेल्या माहेरच्या नातेवाइकांनी झांबरे यांच्या निवासस्थानासह कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

नेमकं प्रकरण काय?

पायल यांचा विवाह १३ मार्च २०१९ रोजी अक्षय झांबरे यांच्याशी झाला होता. लग्नावेळी माहेरच्या कुटुंबीयांनी ५० तोळे सोने, २५ लाख रुपये रोख आणि विवाहासाठी अंदाजे ७० ते ८० लाख रुपये खर्च केल्याचे पायल यांचे भाऊ ऋषिकेश पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

मात्र, लग्नानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यांतच सासरच्या मंडळींकडून प्रत्येक सणाला पैसे आणि सोने आणण्याचा तगादा सुरू झाल्याचा आरोप आहे. सासरच्या मंडळींच्या मागण्या पूर्ण करूनही पायल यांचा छळ थांबला नाही. घरकामावरून त्रास देणे, खर्चासाठी पैसे न देणे आणि माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकणे, असे प्रकार सुरू होते. पायल यांना स्वतःच्या खर्चासाठीही माहेरून पैसे घ्यावे लागत असल्याचा दावा त्यांच्या भावाने केला आहे.

मुलगी झाल्यानंतर छळात वाढ; वर्षभर माहेरी राहण्याची वेळ

मार्च २०२३ मध्ये पायल यांनी मुलीला जन्म दिला. मात्र, मुलगा झाला नाही म्हणून रुग्णालयातच वाद घालण्यात आल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. आई आणि बाळाची जबाबदारी घेणार नसल्याचे सांगून सासरच्या मंडळींनी रुग्णालयातून निघून जाण्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकारानंतर पायल जवळपास वर्षभर माहेरी राहिल्या. नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर त्या पुन्हा सासरी परतल्या. मात्र, त्यानंतरही त्यांचा छळ सुरूच राहिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 'तुला मुलगी झाली आहे, फ्लॅटमध्ये दोरी आहे, ओढणीने पंख्याला लटकून जा,' अशा अपमानास्पद शब्दांत त्यांना हिणवले जात असल्याचा आरोप आहे.

Payal Zambre Suicide Case
Shinde Shivsena Split : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत फूट पडणार? पक्षात तीन 'शिंदे' तयार, खासदाराच्या दाव्याने खळबळ!

माहेरची जमीन नावावर करण्यासाठी दबाव

पायल यांच्या वडिलांच्या नावावर असलेली जमीन मुलाच्या नावावर करून द्यावी, अशी मागणी सासरच्या मंडळींकडून केली जात होती. जमीन नावावर केली नाही, तर घटस्फोट घेऊन निघून जा, असा दबाव टाकण्यात येत असल्याचेही भावाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

आयटी क्षेत्रातील करिअरमध्येही अडथळे

पायल उच्चशिक्षित होत्या. त्यांनी एमएस्सी कॉम्प्युटरचे शिक्षण घेतले होते. त्या एका आयटी कंपनीत नोकरी करत होत्या. करिअरमध्ये प्रगती करत असताना त्यांना प्रमोशनची संधी मिळाली होती. मात्र, नोकरी सोडून घराकडे लक्ष द्यावे, यासाठी सासरच्या मंडळींकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप माहेरच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे वैयक्तिक आयुष्याबरोबरच व्यावसायिक प्रगतीतही त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागत होता.

दिवाळीत पाच तोळे सोन्याची मागणी; भावाला पाठवला शेवटचा संदेश

१ नोव्हेंबर रोजी पायल खेड शिवापूर येथील माहेरी गेल्या होत्या. यावेळी सासरच्या मंडळींकडून दिवाळीसाठी पाच तोळे सोने आणण्याचा तगादा सुरू असल्याचे त्यांनी भावाला सांगितले. त्यानंतर त्या सायंकाळी कॅबने पुण्यातील मुकुंदनगर येथील घरी परतल्या.

रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी त्यांनी भावाच्या मोबाईलवर 'माझ्या आत्महत्येला माझी सासू जबाबदार आहे,' असा संदेश पाठविला. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. भावाने पती अक्षय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी अरेरावीची भाषा करून फोन कट केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

घराची काच फोडून प्रवेश; किचनमध्ये आढळला मृतदेह

२ नोव्हेंबर रोजी सकाळी माहेरचे नातेवाईक पायल यांना भेटण्यासाठी मुकुंदनगर येथील घरी पोहोचले. मात्र, पायल कुठे आहेत, याबाबत सासरच्या मंडळींकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने नातेवाइकांचा संशय बळावला.

त्यानंतर पायल यांचे भाऊ ऋषिकेश यांनी पार्किंगमधून मागील गॅलरीत जाऊन हॉलची काच फोडली आणि घरात प्रवेश केला. त्यावेळी किचनमध्ये पायल यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.

संतप्त नातेवाईकांकडून घर आणि कार्यालयाची तोडफोड

पायल यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर माहेरच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी झांबरे यांच्या घरासह कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हस्तक्षेप केला.

पती, सासू-सासरे अटकेत; नणंदेविरुद्धही गुन्हा

पायल यांचे भाऊ ऋषिकेश पवार यांच्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलिसांनी पती अक्षय, सासरे अरविंद, सासू मंगल आणि नणंद अक्षता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुरुवातीला पती अक्षय याला अटक करण्यात आली. त्यानंतर सासू मंगल आणि सासरे अरविंद यांनाही पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक झाली आहे.

Payal Zambre Suicide Case
Pune Police : बदली मनासारखी झाली नाही म्हणून थेट पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्याबाहेर राडा; पोलीस दलात खळबळ!

एफआयआरमधील आरोपांमुळे प्रकरणाला गंभीर वळण

पायल यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत लग्नावेळी दिलेले सोने, रोख रक्कम, लग्नाचा खर्च, त्यानंतर वारंवार झालेल्या पैशांच्या मागण्या, मुलगी झाल्यानंतरचा कथित छळ, माहेरच्या जमिनीची मागणी आणि दिवाळीसाठी पाच तोळे सोन्याचा तगादा, अशा अनेक बाबींचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी पायल यांनी भावाला पाठविलेला संदेशही या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.

दरम्यान, पायल यांच्या मृत्यूमागील नेमकी कारणे, चारही आरोपींची भूमिका, आत्महत्येपूर्वी झालेला संवाद आणि हुंड्याच्या मागण्यांसंदर्भातील पुरावे यांचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.