Mumbai News: डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्तपदाची जबाबदारी स्विकारताच राज्यातील अवैध धंदेवाल्यांचं धाबं दणाणलं आहे. राज्यात सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते यांच्या विक्रीविरोधात अत्यंत आक्रमक आणि जोरदार मोहीम उघडली आहे.
आयुक्त तुकाराम मुंढेंनी राज्यभरात सुरू केलेल्या याच बेधडक कारवायांमुळे बिथरलेल्या गुटखामाफियांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेतानाच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आयुक्त तुकाराम मुंढेंना याप्रकरणी कठोर कारवाईसाठी 'फ्री हँड' दिले आहेत.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखामाफियांनी महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेची तत्काळ दखल घेतली गुटखा माफियांना कडक इशारा दिला आहे. सरकारी कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना 'एफडीए'क़डून कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी छत्रपती संभाजीनगरमधील गुटखामाफियांनी महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत सरकार अतिशय गंभीर असल्याचंही सुनावलं.
संबंधित महिला अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत झिरवाळ यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग हा ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. त्यांनी अशाप्रकारच्या गुन्हेगारी घटना खपवून घेतल्या जाणार नसल्याचं तुकाराम मुंढेंना पुढील कठोर कारवाईसाठी एकप्रकारे फ्री हँड दिल्याचंच स्पष्ट केलं आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पोलीस प्रशासन तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला छत्रपती संभाजीनगरमधील या घटनेप्रकरणातील आरोपींसह गुटखा माफियांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासन विभागाला दिल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच दोषींना कायद्याच्या चौकटीत राहून कठोर शिक्षा मिळेल,असंही म्हटलं.
मंत्री झिरवाळ यांनी याप्रकारच्या कोणत्याही दबावाला आमचं प्रशासन बळी पडणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले.अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असल्याचं स्पष्ट केलं.
याचवेळी त्यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात सुरू असलेली एफडीएची कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.त्यांना कोणतीही माफी नसल्याचं झिरवाळ यांनी नमूद केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.