Ready Reckoner Rate Update : घर खरेदी करणार असाल तर राज्य शासनाने तुम्हाला दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने 'रेडीरेकनर' दरामध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या रेडीरेकनर दराप्रमाणे, म्हणजे 2022-23 च्या रेडी रेकनर दराप्रमाणे घर खरेदी करता येणार आहे.
2022-2023 च्या दरात कोणताही बदल न करता तोच दर 2023-2024 या वर्षासाठी लागू करण्यात यावा, असं राज्य सरकारच्या आदेशात म्हटलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे- फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून 2023 -24 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र शासनाने मुल्यांकन दर म्हणजेच रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी एक एप्रिल रोजी रेडीरेकनरचे दर नव्याने लागू करण्यात येतात.
त्यानुसार मुद्रांक शुल्क विभागाने पुढील आर्थिक वर्षाच्या रेडीरेकनरचे नवे दर प्रस्तावित केले होते. रेडीरेकनार दरात 5 ते 7 तक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, परंतू हे दर "जैसे थे" ठेवण्यात आले आहेत.
रेडीरेकनर म्हणजे काय?
दरवर्षी राज्य सरकार विविध क्षेत्रांवर आधारित नवीन रेडीरेकनर दर लागू करतात. रेडीरेकनर दर हा वेगवेगळ्या शहर किंवा भागात वेगवेगळा असतो. या दराच्या आधारावर कोणत्याही मालमत्तेशी संबंधित व्यवहारासाठी नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क आकारते.
नोंदणी महानिरीक्षक तथा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांच्या मान्यतेनंतर रेडीरेकनर दरवर्षी निश्चित केलं जातं. या दराचा उपयोग सर्वसामान्य माणसांपासून बांधकाम व्यावसायिक, कर्ज देणाऱ्या बँका, वकील, एजंट इत्यादींना होतो.
मागच्या वर्षी वाढ करण्यात आली होती.
राज्यात कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे रेडीरेकनर दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र, त्यांनतर गेल्या वर्षी रेडीरेकनरच्या दरात जवळपास '5 टक्के' वाढ करण्यात आली होती. महानगरपालिका क्षेत्रात 8.80 टक्के, तर ग्रामीण भागात 6.96 टक्के तर नगरपालिका क्षेत्रात 3. 62 टक्के वाढ करण्यात आली होती. मुंबई, ठाणे, पुण्यापेक्षा नाशिकमध्ये रेडी रेकनरचे दरात सर्वाधिक वाढ झाली होती.