RTO Fine for Number Plate: तुमच्या वाहनावर अजूनही हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवलेली नसेल, तर आता सावध व्हा. राज्य परिवहन विभागाने याबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून 18 फेब्रुवारीपासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. अंतिम मुदत संपून जवळपास एक महिना उलटूनही मोठ्या संख्येने वाहनधारकांनी नियमाचे पालन न केल्यामुळे ही कारवाई सुरू करण्यात येत आहे.
राज्यातील खासगी तसेच व्यावसायिक अशा सर्व प्रकारच्या वाहनांना हा नियम लागू आहे. ज्या वाहनांवर अद्याप HSRP बसवलेली नाही, तसेच 31 डिसेंबर 2025 नंतर नोंदणी केलेली किंवा नोंदणी न केलेली वाहने आढळल्यास थेट दंड आकारला जाणार आहे. राज्यात लाखो वाहनांची नोंदणी असताना अपेक्षित प्रमाणात HSRP बसवण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये प्रतिसाद कमी असल्याचे दिसून आले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना 1,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तपासणीदरम्यान केवळ नंबर प्लेटच नव्हे, तर वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC), विमा, प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र (PUC) आणि चालकाचा परवाना यांचीही पडताळणी केली जाईल. यापैकी कोणतेही कागदपत्र अपूर्ण किंवा अनुपस्थित असल्यास अतिरिक्त दंडाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांनी सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.
18 फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही मोहीम राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आणि राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांवर राबवली जाईल. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक शहरी भागांत विशेष पथके तैनात केली जाणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात HSRP बसवण्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याने येथे अधिक कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ज्या वाहनधारकांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी HSRP साठी नोंदणी केली आहे पण प्रत्यक्ष प्लेट बसवून घेतलेली नाही, त्यांना प्रशासनाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत नंबर प्लेट बसवून घेतल्यास दंडात्मक कारवाई टाळता येणार आहे. ही सवलत ‘ग्रेस पिरीयड’ म्हणून देण्यात आली असून त्यानंतर कोणतीही सूट मिळणार नाही.
हाय-सिक्युरिटी नंबर प्लेटमध्ये खास सुरक्षा वैशिष्ट्ये असतात. त्यावर क्रोमियम आधारित होलोग्राम, लेझर कोडिंग आणि युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक असतो. त्यामुळे वाहनांची ओळख अचूकपणे पटते, चोरीच्या वाहनांचा माग काढणे सोपे होते आणि बनावट नंबर प्लेटचा वापर रोखता येतो. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही व्यवस्था अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
दरम्यान, राज्यभरातील फिटमेंट केंद्रांवर सध्या मोठी गर्दी होत आहे. अनेक वाहनधारकांनी वेळेवर अपॉइंटमेंट न घेतल्याने आणि नोंदणी करूनही हजर न राहिल्याने प्लेट्सचा साठा पडून असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने नागरिकांना तातडीने अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून निश्चित वेळेत HSRP बसवून घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा दंडासह अनावश्यक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.