

How to check PM Kisan 22nd installment status online: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता रखडल्याने देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि चिंता दोन्ही वाढल्या आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2025 मध्ये या योजनेचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता.
त्यानंतर 22 व्या हप्त्याची अपेक्षा होती. सुरुवातीला अंदाज असा होता की अर्थसंकल्प 2026 नंतर लगेच हा हप्ता जाहीर केला जाईल, मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात “हप्ता नेमका का थांबला?” हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.
या विलंबामागे सरकारकडून अधिकृत अशी एकच ठोस कारणे जाहीर करण्यात आलेली नसली, तरी काही महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत. त्यापैकी पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे फार्मर आयडीची अट.
जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने स्पष्ट केले होते की पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. यानंतर अनेक राज्यांमध्ये विशेष मोहिमा राबवून शेतकऱ्यांचे नोंदणी अभियान सुरू झाले. मात्र अजूनही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार झालेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची अंतिम यादी पूर्ण होण्यास उशीर होत आहे.
दुसरे मोठे कारण म्हणजे अपात्र आणि बनावट लाभार्थ्यांची छाननी. काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी एकाच जमिनीवर अनेक जण हप्ता घेत असल्याचेही आढळून आले.
यामुळे केंद्र सरकारने राज्यांना कठोर तपासणीचे निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेशात नुकतेच सुमारे १९ लाख शेतकऱ्यांच्या हप्त्यावर तात्पुरती रोक लावण्यात आली आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता वितरित केला जाणार असल्याने यामुळेही विलंब होत आहे.
याशिवाय फार्मर आयडीसाठी ऑनलाइन अर्ज करताना अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. इंटरनेटची मर्यादा, तांत्रिक माहितीचा अभाव आणि प्रक्रियेतील गुंतागुंत यामुळे अनेक जण स्वतः अर्ज करू शकत नाहीत. परिणामी सीएससी केंद्रे आणि शिबिरांमध्ये मोठी गर्दी होत आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 22 वा हप्ता थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 22 वा हप्ता नेमका कधी येणार? यावर सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी अनेक तज्ज्ञांच्या मते होळीपूर्वी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपली फार्मर आयडी, बँक खाते आणि आधार संलग्नतेची माहिती अद्ययावत ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.