Chhagan Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : '...म्हणून शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत गेलो', ऐन निवडणुकीच्या तोंडावर भुजबळांचा खळबळजनक दावा

Bhujbal Explains Leaving Sharad Pawar: मला ईडीच्या तावडीतून सुटल्यानंतर पुनर्रजन्म झाल्यासारखं वाटलं. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासारखे नेते तुरुंगात गेले होते. ईडीपासून सुटका हवी असेल तर भाजपसोबत जावं लागेल, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती.

Jagdish Patil

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या एका मोठ्या दाव्याने खळबळ उडाली आहे. ईडीपासून सुटका व्हावी यासाठी आपण भाजपसोबत गेलो, असं भुजबळ यांनी सांगितल्याचा दावा राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे.

या दाव्यामुळे आता राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवाय ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या दाव्याने महायुतीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

'द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया' या राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. शिवाय मी ओबीसी असल्यामुळेच माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचं भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितल्याचा दावाही करण्यात आला आहे.

मला ईडीच्या (ED) तावडीतून सुटल्यानंतर पुनर्रजन्म झाल्यासारखं वाटलं. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासारखे नेते तुरुंगात गेले होते. ईडीपासून सुटका हवी असेल तर भाजपसोबत जावं लागेल, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती.

अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह सुनील तटकरे, हसन मुश्रीफ अशा अनेक नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे ईडीपासून सुटका करण्यासाठी भाजपसोबत जावं लागेल, असं नेत्यांना वाटत होतं.

याची माहिती शरद पवार (Sharad Pawar) यांना देखील होती पण ते यासाठी अनुकूल नव्हते. त्यामुळे आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वात भाजपसोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला, असा मोठा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यामुळे आता या दाव्यावर अजित पवार यांच्याकडून काय स्पष्टीकरणं दिलं जाणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT