Imtiaz Jaleel Campaigning In Delhi News Sarkarnama
महाराष्ट्र

AIMIM campaigning News : दिल्लीच्या 'गल्लीत'घुमतोय इम्तियाज जलील यांचा आवाज!

The MIM party is fielding two candidates in the upcoming Assembly elections. : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका त्यात एमआयएमने सत्ताधारी पक्षांनी दिलेली टक्कर याचा हवाला देत इम्तियाज जलील मतदारांना आवाहन करत आहेत. दिल्लीतील ओखला विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे शफी उर रेहमान, मुस्तफाबादमधून हाजी ताहेर हूसेन हे निवडणूक लढवत आहेत.

Jagdish Pansare

Imtiaz Jaleel News : एमआयएमचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील सध्या दिल्ली विधानसभेच्या प्रचारात व्यस्त आहेत. ओखला, मुस्तफाबाद मतदारसंघातील गल्ली, मोहल्ल्यांमध्ये सध्या त्यांचाच आवाज घुमतोय. मतदारांना आवाहन करतांना महाराष्ट्रात विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाने कसा विजय मिळवला? हे सांगत इम्तियाज जलील पक्षासाठी मतं मागत आहेत.

पत्रकारिता करता करता 2014 च्या विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मधील मध्य मतदारसंघात इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी एमआयएमकडून नशिब आजमावले. पहिल्याच प्रयत्नात त्यांच्यासाठी विधानसभेची दारे उघडली गेली. आमदारकीची टर्म संपत नाही तोच 2019 ची लोकसभा ते लढले आणि देशात चर्चा घडवणाऱ्या ऐतिहासिक विजयाची नोंद इम्तियाज जलील अन् एमआयएम पक्षाच्या नावावर झाली.

आक्रमक भाषण शैली, मुद्देसुद मांडणी आणि विरोधकांना अंगावर घेण्याची तयारी या गुणांमुळे पक्षाचे सर्वेसर्वा असदोद्दीन ओवेसी (Asadudding Owasi) यांच्या गळ्यातील ताईत बनलेले इम्तियाज जलील पक्षातील दुसऱ्या क्रमाकांचे नेते ठरत आहेत. गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश सारख्या राज्यात विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची धुरा ओवेसी यांच्या बरोबरीने सांभाळली होती. सध्या ते दिल्ली विधानसभेतील ओखला आणि मुस्तफाबाद मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

दिल्लीतील ओखला विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे शफी उर रेहमान, मुस्तफाबादमधून हाजी ताहेर हूसेन हे निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका त्यात एमआयएमने सत्ताधारी पक्षांनी दिलेली टक्कर याचा हवाला देत इम्तियाज जलील मतदारांना आवाहन करत आहेत. दोन जागा लढण्यामागे ताकदीने लढून त्या जिंकणे हा उद्देश असल्याचे ते सांगतात. भविष्यात तुमच्यामधून नेते तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही दोन आमदार निवडून दिले तर आमची ताकद वाढेल, समाजाचे प्रश्न सरकार कडे मांडून त्यासाठी आवाज उठवता येईल.

उत्तराखंड राज्यात समान नागरी कायदा लागू झाला आहे, आपण एकजूट दाखवली नाही तर तो उद्या देशातील इतर राज्यात लागू होईल. आम्हाला टोपी घालता येणार नाही, दाढी राखता येणार नाही, मशि‍दीवरील लाऊडस्पीकर उतरवले जातील. आम्हाला त्रास देण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव हाणून पाडा. काँग्रेस, भाजप, आम आदमी पार्टी हे एकाच माळेचे मनी आहेत. शेवटचे दोन दिवस प्रचाराचे शिल्लक आहेत मोठे पक्ष, त्यांचे नेते पैसे घेऊन येतील. हा काळ तुमच्या परीक्षेचा असेल तुम्ही डगमगू नका आणि आपल्या उमेदवारांना निवडून आणा, असे आवाहन इम्तियाज जलील गल्लीबोळात जाऊन करत आहेत.

एक चहा अन् दोन केळी..

महाराष्ट्रातून आम्ही इथे येऊन मेहनत घेत आहोत. रात्रंदिवस पदयात्रा, दौरे, प्रचार सभा घेत आहोत. तुमचा प्रतिसाद एवढा प्रचंड आहे, की जेवायलाही वेळ नाही. सकाळी एक चहा आणि रस्त्यावरील एखाद्या हातगाडीवरील दोन केळी खाऊन मी प्रचार करत आहे, असे सांगत इम्तियाज जलील मतदारांना भावनिक साद घालतांना दिसत आहेत. जे महाराष्ट्रात अशक्य वाटतं होतं ते आम्ही शक्य करून दाखवले. दिल्लीतही आपण विजय मिळवू शकतो, असा विश्वास ते मतदारांना देत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT