Mumbai News : महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून बराच खल सुरू आहे. यातून तिढा वाढत असतानाच सर्वांनीच सावध भूमिका घेतलीय. काँग्रेसच्या मुंबईच्या बैठकीत देखील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून लढण्याची तयारी असली, तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यावर चर्चा झाली.
विधिमंडळाचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी बैठकीत महाविकास आघाडी राज्यात एकजुटीने लढण्यास 180 जागांवर यश मिळवेल आणि यात काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असा विश्वास व्यक्त केला. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसमोर ही भूमिका मांडताच, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष सावध झाले आहेत.
महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचा उच्चांक महायुती सरकारने गाठला आहे. मंत्रालयापासून ते खालपर्यंत बिनधास्तपणे भ्रष्टाचार सुरू आहे. महागाई, बेरोजगारीवर कोणी बोलत नाही. लोकप्रिय योजनांची घोषणा करून निवडणूक लढवण्याचा घाट सत्ताधारी महायुती घालताना दिसत आहे, असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लगावला. परंतु यातून समाजाचे पर्यायाने महाराष्ट्राचे नुकसान होताना दिसते. शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या पिकांवर सत्ताधारी बोलत नाहीत. विरोधकांनी बोलले की, फेक नरेटिव्ह, असे म्हणत सत्ताधारी दुर्लक्ष करत आहेत. यामुळे महाविकास आघाडीचा लढाई महाराष्ट्रासाठी योग्य दिशेने सुरू आहे, असे सांगून सत्ताधाऱ्यांविरोधात महाराष्ट्रात रोष दिसतोय, याकडे बाळासाहेब थोरात यांनी लक्ष वेधले.
महाविकास आघाडी राज्यात एकजुटीने लढण्यास 180 च्यावर जागा निवडून येतील. यात काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांसमोर थेट मुख्यमंत्री पदावर काँग्रेसकडून दावा केला असला, तरी त्यावर नेत्यांनी चुप्पी साधली. परंतु महाविकास आघाडीतील मित्रपक्ष अलर्ट झाले आहेत. विशेष करून, शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सावध झाला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा, अशी मागणी मध्यंतरी केली होती.
यावर महाविकास आघाडीत बराच खल झाला. पुढे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यांवरून बॅनरबाजी रंगली. ही बरीच गाजली. यात महाविकास आघाडीत प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष देखील मागे नव्हता. जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्री पदावरून बॅनरबाजी झाली. महायुतीमध्ये देखील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावर अंतर्गत धुसफूस सुरू आहे. भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला वारंवार टार्गेट केले जात आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गट देखील मुख्यमंत्रीपदावर दावा सांगता यावा, यासाठी काहीसा सावध होत सर्वाधिक जागा खेचण्याच्या तयारी आहे.
काँग्रेसने राज्यात विधानसभा निवडणूक किती जागा लढवणार याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे राज्यातील नेत्यांनी सादर केला आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे 20 आॅगस्टला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दिवशी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती असल्याने, याच दिवशी राज्यात काँग्रेस विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकेल. यानिमित्ताने राज्यभरातून लाखो कार्यकर्ते मुंबईत आणून काँग्रेस शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. राहुल गांधी यावेळी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे संकेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.