Satara, 21 July : लोकसभा निवडणुकीनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. या वेळची विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे; तर सत्ता बदलासाठी महत्वाची आहे. महाविकास आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढवणार, हे आठ दिवसांत जाहीर होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
गुरुपौर्णिमेनिमित्त कऱ्हाड (जि. सातारा) येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन केल्यानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharadchandra Pawar Party) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला विभागाच्या संगीता साळुंखे, प्रभाकर देशमुख, देवराज पाटील उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. पवार हे केवळ निवडणूक असल्यामुळे महाराष्ट्रात फिरत नाही, तर कायमच फिरत असतात. खासदार सुळे म्हणाल्या, विधानसभेची निवडणूक महत्वाची असून ती जिंकण्यासाठी नव्हे; तर सत्ता बदलासाठी महत्वाची आहे. सध्या महाराष्ट्र गुंतवणूक, उद्योगात एक नंबरला दिसत नाही, हे दुर्दैव आहे.
सुळे म्हणाल्या, ज्यावेळी चर्चा होईल, त्यावेळी जागा निश्चिती होईल. मात्र, महाविकास आघाडी या वेळी सरकार बदलणार आहे. या एमबीबीएस म्हणजेच महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करुन पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याची गरज आहे. दुधाला दर नाही.
शेती अडचणीत आहे. शेती खात्यात 118 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे आरएसएसने संगितल्याचे मी वाचले आहे. त्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करुन कारवाई करायला हवी होती. मात्र त्यांनी चौकशी लावलेली नाही. या सरकारने शेतकऱ्याचे कंबरडे मोडायचे ठरवलेच आहे. महाविकास आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढवणार, हे येत्या आठ दिवसांत महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात येईल, असेही सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले.
साताऱ्यात चिन्हाबद्दल विरोधकांचा रडीचा डाव
बारामतीच्या अगोदर साताऱ्याची सीट येणार, असा आमचा सर्व्हे होता. मात्र, दुर्दैवाने पिपाणी आणि तुतारी यात आमच्या पक्षाचे मोठे नुकसान झाले असे सांगून खासदार सुळे म्हणाल्या, निवडणूक आयोगाकडे आम्ही चिन्हाबाबत हरकत घेतली होती. एकसारख्या चिन्हामुळे दिंडोरीला दीड लाख मते गेली. साताऱ्याला दुसरी पिपाणी नसती, तर आज आमचाच खासदार असता. मात्र, विरोधक रडीचा डाव खेळत असतात.
वर्ध्याला पिपाणी निवडणूक आयोगाने थांबवली, मात्र साताऱ्यात ती थांबवली नाही. त्यामुळे आमचा पराभव झाला. आम्ही पूर्ण आत्मचिंतन करून कुठे कमी पडलो, याचा विचार करुन पुढे जाऊ, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.