Tribal Department Recruitment 
महाराष्ट्र

Job Recruitment: 'आदिवासी' विभागातील शिक्षक भरतीबाबत शासनाचा मोठा निर्णय; बनावट कागदपत्र दिल्यास होणार करेक्ट कार्यक्रम

Job Recruitment: आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारनामा ब्युरो

Job Recruitment : राज्यातील आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यापुढे या आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या जागांची भरती पूर्णपणे 'पवित्र' पोर्टलद्वारेच करणे बंधनकारक करण्यात आले. आदिवासी विकास विभागाने या संदर्भातील मार्गदर्शक सूचना आणि पारदर्शक कार्यपद्धती जाहीर केली असून, यामुळे भरतीतील गैरव्यवहारांना चाप बसून उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांना समान संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा विभागाने केला.

शासन निर्णयानुसार, आता 'सरल' प्रणालीवरील नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे प्रथम अनुदानित आश्रमशाळांची संचमान्यता केली जाईल. संचमान्यतेनंतर अतिरिक्त शिक्षकांचे पूर्ण समायोजन झाल्यावरच रिक्तजागांची अचूक माहिती 'पवित्र' पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित शैक्षणिक संस्थांना विषयनिहाय, माध्यमनिहाय आणि प्रवर्गनिहाय बिंदूनामावलीनुसार रिक्त जागांचा तपशील पोर्टलवर भरावा लागेल. या भरती प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त आणि आदिवासी विकास आयुक्त यांना स्वतंत्र लॉग इन आयडी उपलब्ध करून दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, अपर आयुक्तांनी जाहिरात प्रस्तावावर सात कार्यालयीन दिवसांत निर्णय न घेतल्यास, त्याची थेट नोंद त्यांच्या गोपनीय अहवालात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भरती प्रक्रियेत उमेदवाराने सादर केलेली कागदपत्रे पडताळणीवेळी किंवा सेवा कालावधीत कधीही बनावट अथवा खोटे आढळल्यास, संबंधित उमेदवाराविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करून त्याला सेवेतून त्वरित बडतर्फ करण्यात येईल. तसेच, पोर्टलद्वारे शिफारस झालेल्या उमेदवाराला सात कार्यालयीन दिवसांत नियुक्ती देणे संस्थांना बंधनकारक असेल. जर कोणत्याही संस्थेने उमेदवाराला नियुक्ती नाकारली किंवा प्रक्रिया प्रलंबित ठेवली, तर संबंधित शिक्षकाची जागा दोन शैक्षणिक वर्षांसाठी उपलब्ध राहणार नाही. ज्या शैक्षणिक संस्था या संगणकीय 'पवित्र' प्रणालीबाहेर जाऊन शिक्षक भरती करतील, त्यांना संबंधित पदांचे वेतन किंवा वेतनेतर अनुदान शासनाकडून देय होणार नाही, असा इशाराही या शासन निर्णयात देण्यात आला.

निवडीचे असे असतील निकष

  • अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारावरच उमेदवारांची अंतिम निवड

  • मुलाखतीसह निवडीचा पर्याय निवडणाऱ्या संस्थांना १:३ या प्रमाणात, तर मुलाखतीशिवाय निवड करणाऱ्या संस्थांना १:१ या प्रमाणात उमेदवार उपलब्ध होणार

  • मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT