KDMC News : पुण्यातील एका महाविद्यालयातील कार्यक्रमात मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढल्याच्या कथित प्रकाराचे राजकीय पडसाद आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत उमटले आहेत. या प्रकरणावरून भाजपने मनसेला सत्तेतून बाहेर करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाकडे केली होती. मागणी मान्य न झाल्यास विरोधी पक्षात बसण्याचा इशाराही भाजपकडून देण्यात आला. त्यानंतर बुधवारी झालेल्या महासभेत भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले.
महासभेत भाजपचे गटनेते शशिकांत कांबळे यांनी सभा दिवसभरासाठी तहकूब करण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीनंतर महापौर हर्षाली चौधरी यांनी महासभा तहकूब केली. विशेष म्हणजे, या निर्णयाला शिवसेना शिंदे गटासह ठाकरे गटानेही पाठिंबा दिला. मात्र, मनसे आणि काँग्रेसने भाजपच्या भूमिकेवर आक्षेप घेत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली.
भाजप गटनेते शशिकांत कांबळे यांनी फोटोप्रकरणाचा निषेध करत या विषयाचे गांभीर्य अधोरेखित केले. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनीही या मुद्द्यावर आपली भूमिका मांडत महासभा तहकुबीला पाठिंबा दिला. त्यामुळे सभागृहात भाजपविरोधातील अपेक्षित राजकीय समीकरणांपेक्षा या मुद्द्यावर वेगळीच जुळवाजुळव पाहायला मिळाली.
काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी मात्र भाजपच्या भूमिकेवर थेट निशाणा साधला. “सत्तेत राहून विरोध करण्याचे नाटक कशासाठी? एवढाच विरोध असेल तर राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडा,” असा टोला त्यांनी लगावला. जनतेच्या प्रश्नांसाठी महासभा असताना एका राजकीय वादावर सभा तहकूब करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
मनसेचे गटनेते प्रल्हाद म्हात्रे यांनी भाजपला आणखी थेट आव्हान दिले. “भाजपने सत्ता सोडली तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्याकडे बहुमत आहे आणि आम्ही सत्तेत सक्षम आहोत. सत्तेत आले ते वाटा घेण्यासाठी; जनतेच्या प्रश्नांशी यांना देणेघेणे नाही,” अशी टीका त्यांनी केली.
केडीएमसीमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसे सत्तेत असले, तरी तिन्ही पक्षांमध्ये राजकीय कुरघोडी सुरू असल्याचे वारंवार दिसून आले आहे. पुण्यातील फोटोप्रकरणाने या मतभेदांना निमित्त मिळाले आहे. भाजपने सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्यानंतर मनसेनेही ‘आमच्याकडे बहुमत आहे’ असे सांगत प्रतिआव्हान दिल्याने सत्तेतील संघर्ष आता केवळ नाराजीपुरता राहिलेला नाही.
आगामी महासभांमध्ये भाजपची भूमिका काय राहते, शिवसेना शिंदे गट मनसेसोबतची सत्ता कायम ठेवतो का आणि काँग्रेस-मनसेच्या आक्रमक भूमिकेचा सभागृहातील समीकरणांवर किती परिणाम होतो, यावर KDMCच्या राजकारणाची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.