Ambernath tender war; Shivsena MP Shrikant Shinde Sarkarnama
कोकण

Ambarnath Tender War : अंबरनाथमध्ये ‘टेंडर वॉर’! भाजप-शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर; श्रीकांत शिंदेंचा बैठकीतच नगराध्यक्षांसह नगरसेवकांना इशारा

Shrikant Shinde Warns BJP-Shivsena Councillors Over Ambarnath Tender War : अंबरनाथ नगरपालिकेतील विकासकामांच्या टेंडरवरून भाजप-शिवसेनेतील नगरसेवकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात भेट घेतली होती.

Aslam Shanedivan

Ambarnath Tender War News : अंबरनाथ नगर परिषदेत बिलो टेंडर अर्थात अंदाजित दरापेक्षा कमी दराने निविदा भरून विकासकामे करण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. या वादामुळे शहरातील विकासकामांच्या दर्जावर आणि कामांच्या वेळेत पूर्ण होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांच्यासह नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीला शिवसेनेचे नगरसेवकही उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांना विकासकामांचा दर्जा राखण्याबाबत स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.

बिलो टेंडरवरून भाजप-शिंदेसेनेत मतभेद?

अंबरनाथ नगर परिषदेत कमी दराने निविदा भरून विकासकामे करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. कमी दरात कामे घेतल्यामुळे त्यांचा दर्जा घसरू शकतो आणि विकासकामे वेळेत पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. या निविदा प्रक्रियेत शिवसेनेतील काही व्यक्तींचाही सहभाग असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे, विकासकामे अपूर्ण राहिल्यास त्याची जबाबदारी नगराध्यक्ष आणि भाजपवर ढकलली जाऊ नये, अशी भूमिका भाजपकडून घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बिलो टेंडरचा मुद्दा केवळ निविदा प्रक्रियेपुरता मर्यादित न राहता दोन्ही पक्षांमधील राजकीय संघर्षाचे कारण ठरण्याची शक्यता आहे.

श्रीकांत शिंदेंची तंबी

या ‘टेंडर वॉर’ची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गंभीर दखल घेतल्याचे समजते. कमी दराने कामे केली जात असल्याबाबत तक्रारी आल्यानंतर त्यांनी ठाण्यातील निवासस्थानी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही पक्षांमधील मतभेद आणि विकासकामांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. विकासकामांचा दर्जा राखला गेला नाही, तर यापुढे निधी दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.

बैठकीला तेजश्री करंजुले आणि आमदार बालाजी किणीकर उपस्थित

या बैठकीला आमदार डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले तसेच भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते. विकासकामांचा दर्जा, निविदा प्रक्रिया आणि कामांच्या अंमलबजावणीवरून निर्माण झालेल्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. खासदारांच्या इशाऱ्यानंतर अंबरनाथ नगर परिषदेत विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत आणि कामांच्या गुणवत्तेत काय बदल होतात, याकडे आता लक्ष लागले आहे. तसेच भाजप आणि शिंदेसेनेतील मतभेद मिटणार की हा वाद आणखी वाढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT