अशोक खरात प्रकरणात पनवेलमधील शिरढोण येथे जमीन व्यवहार उघडकीस आला आहे.
त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सातबारा नोंद झाल्याने वाद वाढला आहे.
महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
panvel : वसंत जाधव
महिलांवर अत्याचार आणि भोंदूगिरीतून कोट्यवधींची कमाई केल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांच्याबाबत नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्याचे अनेक सरकारी अधिकाऱ्यांसह राजकीय नेते, मंत्र्यांसह फोटो समोर आले आहेत. तर रूपाली चाकणकर यांना सुद्धा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले आहे.
दरम्यान एसआयटीकडून अशोक खरातची कसून तपासणी केली जात असतानाच आता त्यांच्या मालमत्तेची पाळेमुळे कोकणापर्यंत गेल्याचे उघड झाले आहे. पनवेलमध्ये त्याच्या जमिन व्यवहाराची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर जमीन व्यवहार, महसूल अधिकाऱ्यांची कथित मदत आणि नातेवाईकांच्या नावावर मालमत्ता खरेदी यामुळे हे प्रकरण अधिकच गाजत आहे.
राज्यभरात कॅप्टन अशोक खरात यांच्या नावाशी संबंधित वादग्रस्त प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच, पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर सातबारा नोंदवण्यात आल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या या व्यवहारात कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हा व्यवहार तातडीने नोंदवण्यासाठी महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार स्थानिक प्रशासनाने सहकार्य केल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, पनवेलमधील अमरधाम स्मशानभूमीसमोरील सह-दुय्यम निबंधक कार्यालय (क्रमांक ४) येथे या व्यवहारांची नोंदणी करण्यात आली. दस्त नोंदणी प्रक्रियेत विलंब होऊ नये म्हणून काही अधिकाऱ्यांनी विशेष तत्परता दाखविल्याचे सांगितले जात आहे. खरातला अटक झाल्यानंतर महसूल विभाग आणि निबंधक कार्यालयातील काही अधिकारीही या प्रकरणामुळे चर्चेत आले असून, ‘हेच ते खरात का?’ असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पनवेल हे झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून ओळखले जाते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, ‘नैना’ प्रकल्प तसेच विरार-अलिबाग मार्गिका यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. हजारो कोटी रुपयांच्या सरकारी आणि खासगी गुंतवणुकीमुळे येथील जमिनींचे दर मोठ्या वेगाने वाढले आहेत. लाखो रुपये प्रति गुंठा या दराने व्यवहार होत असल्याचे समोर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर, अल्पावधीत मोठा नफा मिळवण्यासाठी खरात यांनी पनवेल परिसरात गुंतवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या व्यवहारांसाठी लागलेली कोट्यवधींची रक्कम नेमकी कुठून आली, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर झालेल्या व्यवहारांमध्ये कोणत्या अधिकाऱ्यांनी मदत केली, याचाही तपास करण्याची मागणी जोर धरत आहे.
खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांचे छायाचित्र सर्वत्र प्रसारित झाले असून, पनवेलमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधित व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
1. हा वाद नेमका कशामुळे निर्माण झाला?
जमिनीच्या सातबारा नोंदीत खरातांच्या नातेवाईकांचे नाव आल्यामुळे.
2. हा व्यवहार कुठे झाला?
पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात.
3. या व्यवहारात किती रक्कम होती?
कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आहे.
4. महसूल विभागावर काय आरोप आहेत?
नोंद जलद करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप आहे.
5. पुढे काय होऊ शकते?
या प्रकरणात चौकशी आणि राजकीय वाद अधिक तीव्र होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.