कुळगाव-बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा वर्षानुवर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला.
प्रचाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या खासदार श्रीकांत शिंदेंच्या रणनीतींना मतदारांनी नकार दिला.
म्हात्रे कुटुंबातील सहा उमेदवारांपैकी केवळ तिघे विजयी झाले असून तिघांचा पराभव झाला आहे.
Badlapur politics : ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून कुळगाव बदलापूर मानला जातो. येथील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी एकनाथ शिंदे याचे सुपूत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर होती. मात्र निकालानंतर त्यांच्या राजकीय डावपेचांना भाजपने सुरूंग लावत शिवसेनेचा बालेकिल्लाच उद्धवस्त केल्याचे आता समोर येत आहे. येथे नगराध्यक्ष पदाच्या रूपाने भाजपने सत्ता हातात घेतले असून वामन म्हात्रे यांना मोठा धक्का बसला आहे. येथे एकाच वेळी शिवसेनेनं ६ उमेदवार म्हात्रे यांच्या घरातील दिले होते. मात्र जनतेनं फक्त तिघांना स्विकारले असून तिघांना घरी बसवले आहे. हा पराभव आता म्हात्रेंसह शिंदेंच्या जिव्हारी लागल्याचे समोर येत आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेत थेट नगराध्यक्ष आणि ४९ नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक झाली. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे २४ नगरसेवक निवडून आले आहेत. तर नगराध्यक्ष पदी भाजपच्या रूचिता घोरपडे विजयी झाल्या असून भाजपचे २२ नगरसेवक निवडून आले आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक विजयी झाले असून महाविकास आघाडीतील पक्षांचा सुपडा साफ झाला आहे.
एकीकडे महाविकास आघाडीतील पक्षांचा सुपडा साफ झाला असला तरी दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ल्याला भाजपने सुरूंग लागला आहे. येथे शिवसेनेने म्हात्रेंच्या कुटुंबातील ६ जणांना दिलेल्या उमेदवारांपैकी फक्त तिघांनाच जनतेनं स्विकारलं आहे. तर तिघांना घरी बसवलं आहे.
शिवसेनेनं स्थानिक नेते वामन म्हात्रे यांच्याच कुटुंबात ६ जणांना तिकीट दिल्यानं राज्यभर याची चर्चा झाली होती. राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या होत्या. तसेच म्हात्रे यांच्यावर टीकाही झाली होती. पण आता निकालानंतर म्हात्रेंना येथे जबर धक्का बसल्याचे समोर येत आहे. या निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील तिघांचा पराभव झाला आहे.
त्यांच्या पत्नी वीणा म्हात्रे यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का पत्करावा लागला असून मुलगा वरुण म्हात्रे याला प्रभाग क्रमांक ३ ब मधून हारचा सामना करावा लागला आहे. तसेच वामन म्हात्रे यांचा पुतण्या भावेश म्हात्रे याला प्रभाग क्रमांक २१ ब मधून पराभवाच स्वीकारावा लागला.
या पराभवाची आता राज्यभर चर्चा सुरू झाली असतानाच ६ जणांपैकी कोण जिंकले याची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत वामन म्हात्रे स्वतः, त्यांचे बंधू तुकाराम म्हात्रे आणि तुकाराम म्हात्रे यांच्या पत्नी उषा म्हात्रे यांचा विजय झाला आहे. धक्कादायक म्हणजे भागात राजकीय वजन असणाऱ्या वामन म्हात्रेंचा फक्त ३२ मतांनी विजय झाला आहे. तर त्यांच्या पत्नीचा पराभव होण्यामागे प्रतिस्पर्धी योगेश भोईर ठरले आहेत. ते जायंट किलर ठरले असून त्यांना मिळालेली १५८२ मतेच वामन म्हात्रे यांच्या पत्नीच्या पराभवाचे कारण ठरले आहे.
दरम्यान आता हा पराभव म्हात्रे यांच्यासह शिंदेंच्या जिव्हारी लागला असून त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, महायुतीमध्ये काही ठिकाणी एकत्र लढलो. तर काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत झाल्या आहेत. पण शेवटी जिंकणार महायुतीच आहे. महायुती ७५ टक्के पेक्षा जास्तीच यश मिळवेल असे आम्ही सुरुवातीला सांगितले होते. परंतु त्या पेक्षाही पेक्षा अधिक यश या निवडणुकांमध्ये मिळालेले आहे. खऱ्या अर्थाने ही कामाची पोचपावती आहे. मागील अडीच वर्षांत आम्ही काम केले. या निवडणुकीमध्ये आम्ही टीका-टिप्पणी न करता विकासाचा अजेंडा, स्थानिक प्रश्न, स्थानिक मूलभूत सुविधा यावर आम्ही भर दिला आणि त्यामुळेच हे दैदिप्यमान मानास यश मिळाले असेही शिंदे म्हणाले.
1. कुळगाव-बदलापूर शिवसेनेचा बालेकिल्ला का मानला जात होता?
अनेक वर्षे येथे शिवसेनेचे वर्चस्व राहिल्याने हा भाग बालेकिल्ला मानला जात होता.
2. प्रचाराची मुख्य जबाबदारी कोणाकडे होती?
खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे प्रचाराची प्रमुख जबाबदारी होती.
3. या निवडणुकीत म्हात्रे कुटुंबाचा निकाल कसा लागला?
सहा उमेदवारांपैकी फक्त तिघे विजयी झाले तर तिघांचा पराभव झाला.
4. या निकालाचा शिंदे गटावर काय परिणाम झाला?
शिवसेनेचा मजबूत गड गमावल्याने शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
5. या निकालाचा भविष्यातील राजकारणावर परिणाम होईल का?
होय, ठाणे जिल्ह्यातील आगामी निवडणुकांसाठी हा निकाल महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.