Ratnagiri News : कोकणातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळ माने यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावरून पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली. याबाबतची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली होती. तर या घडामोडीनंतर बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. तर त्यांच्या हकालपट्टीनंतर आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जाणारे कोकणातील शिवसेनेचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी मौन बाळगले होते.
त्यांनी कोणतीही उघड प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यांचे मौनच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले असतानाच ते शिवसेना सोडतील अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आता भास्कर जाधव यांनी मौन सोडले असून अशी चर्चा करणारे मूर्ख असून मी त्यांना किंमत देत नाही असे म्हटले आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेची आता चर्चा होताना दिसत आहे.
कोकणातील विधानपरिषद निवडणुकीत एकीकडे महायुतीतच जोरदार स्पर्धा तयार झाली असतानाच महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांना मैदानात उतरवले. यानंतर महायुतीकडून राष्ट्रवादीला होणारा अंतर्गत विरोध मोडून काढला. ज्यात अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्येचा देखील समावेश आहे.
यामुळे कोकणात आता थेट लढत ही ठाकरेंची शिवसेना आणि महायुतीच्या अनिकेत तटकरे यांच्या होईल असे स्पष्ट चित्र होते. या लढतीकडे अख्खा राज्याचे लक्ष लागले होते. कारण जागेच्या तिकीटासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद लावली होती. आणि मुलगा अनिकेत तटकरे यांना पुन्हा आमदार करण्याचा चंग बांधला होता.
मात्र नितेश राणे यांच्यासोबत बाळ माने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाशी विसंगत भूमिका घेत त्यांनी माघार घेतली. यामुळे राज्यात एकीकडे काँग्रेसची नाचक्की होत असतानाच कोकणात ठाकरेंच्या शिलेदाराने तलवार मॅन केल्याची चर्चा सुरू झाली.
तर हा शिलेदार आमदार भास्कर जाधव यांचा निवटवर्तीय होता. तर त्यांना तिकीट मिळावे यासाठी भास्कर जाधवच आग्रही होते अशी चर्चा होती. ते बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देखील हजर होते. पण त्याच बाळ मानेंनी पक्षाशी फारकत घेतली आणि अर्ज माघार घेतला. यावरून त्यांच्यावर पक्षातील इतर नेते तुटून पडले होते. मात्र भास्कर जाधव यांनी मौन बाळगले होते. त्यांची कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती.
यामुळे बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करणार तर भास्कर जाधव ठाकरेंची शिवसेना सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण आता भास्कर जाधव यांनी आपले मौन सोडत उघड प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव यांनी, आपल्यावर चर्चा करणारे मूर्ख असून त्यांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही. जे आता सकाळी इथे तर सायंकाळी कुठे असतात हे सर्वांना माहित आहे. यामुळे अशांना माझ्याबद्दल चर्चा करण्याचा, बोलण्याचा अधिकार दिला कोणी? म्हणून जे अशी चर्चा करतात ते मूर्खच नव्हे तर महामूर्ख आहेत. चर्चा करणारे मूर्खच असून अशांना आपण किंमत देत नाही असा संताप भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.