Bhaskar Jadhav-Uday Samant Sarkarnama
कोकण

Konkan Politics : भास्कर जाधवांचा आशीर्वाद उदय सामंतांना कशासाठी हवाय?

सरकारनामा ब्यूरो

Chiplun News : शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटातून सध्या विस्तवही जात नाही. विशेषतः कोकणात हे दोन्ही गट छोट्या छोट्या गोष्टीवरूनही आमने सामने येतात. मात्र, त्याच कोकणातील शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मात्र आमदार भास्कर जाधव यांचे कौतुक केले. चांगले अधिकारी मिळविण्याचे कौशल्य आमदार जाधव यांच्याकडे आहे. त्याबाबत त्यांचे कौतुक व्हायलाच पाहिजे. अनेकांना त्यांचा आशीर्वाद मिळतो. ते मलाच आशीर्वाद द्यायला तयार नाहीत, अशा शब्दांत सामंत यांनी कोटी केली. मात्र, सामंत यांना भास्कर जाधवांचा आशीर्वाद कशासाठी पाहिजे, याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती. (Bhaskar Jadhav is not ready to bless me: Uday Samant)

चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे १८ वर्षांनंतर नूतनीकरण होऊन मंगळवारी स्वातंत्र्यदिनी त्याचे लोकार्पण झाले. तो कार्यक्रम एकमेकांनी मारलेल्या कोपरखळ्यांनी गाजला. कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तसेच प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रसाद शिंगटे उपस्थित होते.

आमदार भास्कर जाधव यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासारखा अधिकारी रत्नागिरी जिल्ह्यात आणला, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. गुहागरमध्ये आणून त्यांना ट्रेंनिग दिले आणि ते चिपळूणमध्ये आले. त्यामुळेच फक्त ७५ दिवसांत त्यांनी नाट्यगृहाचे काम पूर्ण केले. भास्कर जाधव यांनी त्यांना आशीर्वाद दिला, असे सामंत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनाही उदय सामंतांनी चिमटे काढले. ते म्हणाले की, शेखर निकम हल्ली जास्तच मूडमध्ये दिसतात. माझ्या कानात त्यांनी काही विषय सांगितले आहेत. पालकमंत्री म्हणून तुमच्या मागण्या पूर्ण करणे ही माझी जबाबदारी आहे, असा मी तुम्हाला शब्द देता. खरं तर निकम यांनी फार उशीर केला आहे. आमच्याबरोबर ते याआधीच आले असते, तर सर्वच मागण्या यापूर्वीच पूर्ण झाल्या असतात. मात्र, अजितदादा आणि त्यांची ही चूक आहे, त्यात मी काय करू?

चिपळूणचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांचा गुहागरचा शिक्षक मीच होतो. तसेच, रत्नागिरीचे आताचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांना चांगला अधिकारी म्हणून चिपळूणला तहसीलदार म्हणून आणणारा देखील मीच होतो, अशी फटकेबाजी आमदार भास्कर जाधव यांनी केली.

आम्ही कधी शत्रू, तर कधी मित्र होतो : शेखर निकम

आम्हीच सर्वात मोठे कलाकार आहोत. आम्ही कधी शत्रू, तर कधी मित्र होतो हे कोणालाच कळत नाही, असे शेखर निकम म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT