रत्नागिरी : शिवसेना (Shivsena) नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे गुहागर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) असलेले त्यांचे पुत्र विक्रांत जाधव (Vikrant Jadhav) यांनीच गुहागर मतदारसंघावर दावा सांगितला आहे. विक्रांत जाधव हे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष आहेत. गुहागर मतदारसंघातून आमदार व्हायला आवडेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे विक्रांत जाधव हे गुहागरमधून लढल्यास भास्कर जाधव कुठून लढणार यावरून जोरदार राजकीय चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विक्रांत जाधव हे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले. जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यावेळी बोलतानाच त्यांनी हा बॉम्ब टाकला. आपल्याला आमदार व्हायला आवडेल आणि तेही गुहागरमधून, असे त्यांनी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भास्कर जाधव हे चिपळूण-संगमेश्वरमधून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता समोर येत आहे. याचवेळी ते रायगडमधून लोकसभेची निवडणूक लढण्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना अद्याप दोन वर्षांचा कालावधी असला तरी भास्कर जाधवाच्या मुलानेच मतदारसंघावर दावा केल्याने ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. मात्र, आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून आमदार भास्कर जाधव आहेत. आता त्यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी गुहागरमधून आमदार होण्याचे जाहीर केले आहे. पण ते शिवसेना की राष्ट्रवादीकडून हे अद्याप स्पष्ट नाही. याचवेळी मुलाने गुहागरमधून निवडणूक लढवल्यास भास्कर जाधव कुठून निवडणूक लढवणार, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
भास्कर जाधवांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी चिपळूण-संगमेश्वर या मतदारसंघात चाचपणी सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असताना भास्कर जाधव यांनी संगमेश्वर तालुक्यात मोठी विकास कामे केली आहेत. याचबरोबर संगमेश्वर तालुक्यात त्यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. तसेच, चिपळूण भागातही त्यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे ते चिपळूण-संगमेश्वरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता समोर येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत रायगडमधून शिवसेनेच्या अनंत गीते यांचा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी पराभव केला होता. शिवसेना लोकसभेसाठी रायगडमधून भास्कर जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडीच्या आगामी राजकीय समीकरणांवर हे सगळे अवलंबून असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.