Bhiwandi Crime News : भिवंडीतील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांचा शोध अद्याप गेत आहेत. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल होऊन एक महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. तर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल करण्यात आलेला अर्ज देखील फेटाळण्यात आला आहे. मात्र, अद्याप दोघेही पोलिसांच्या हाती लागले नसल्याने तपासाच्या प्रगतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या प्रकरणात नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांच्याविरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा पथके तैनात केली असून, विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली जात असल्याची माहिती आहे. रेल्वे स्थानके आणि विमानतळांवरही शोध घेतला गेला असून अद्याप शोध सुरूच आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन एक महिन्याहून अधिक काळ उलटूनही दोघांचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. आरोपी पोलिसांच्या हाती कधी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याणमधील एका विवाहितेला मदत करण्याच्या बहाण्याने फार्महाऊसवर नेऊन आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्यावर करण्यात आला आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर या दोघांच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला; तरीही शोध सुरू
या प्रकरणात नरेंद्र पवार यांच्या वतीने भिवंडी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. पण न्यायालयाने हा अर्ज फेटाळला असून नरेंद्र पवार आणि शैलेश पाटील यांचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेला एक महिन्याहून अधिक काळ उलटूनही दोघांचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने पोलिसांच्या तपासाच्या प्रगतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणातील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे आणि पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या नेतृत्वाखाली पुढे सुरू आहे.
काँग्रेसच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
या प्रकरणावरून काँग्रेसने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी नरेंद्र पवार यांना अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, एक महिन्याहून अधिक काळ उलटूनही आंदोलन झाल्याचे समोर आलेले नसल्याने त्यांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे. आरोपींच्या अटकेची मागणी आणि आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पुढे काय भूमिका घेणार, याकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून सुरू असलेला तपास, आरोपींचा शोध आणि न्यायालयीन प्रक्रियेतील पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.