Bhiwandi Municipal Corruption Case News : राज्यात एकीकडे अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला जात असतानाच दुसरीकडे भिवंडी महानगरपालिकेत अशा बांधकामांना संरक्षण दिले जात असल्याचे समोर आले आहे. या कामात शिपाया पासून ते मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत अनेक जणांचे हात लागत असल्याचे आता समोर आले असून सहाय्यक आयुक्तच लाच घेताना सापडला आहे.
एका अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी तब्बल पाच लाखांची मागणी करणाऱ्या आयुक्तावर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. तर या अधिकाऱ्याला अडिच लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या कारवाईनंतर आता महानगरपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र भोईर हे भिवंडी महानगरपालिकेत प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यांची नियुक्ती सर्वेअर तथा इमारत निरीक्षक म्हणून आहे. दरम्यान येथील प्रभाग समिती क्रमांक तीनमध्ये अनधिकृत बांधकाम सुरू होते. ज्याची माहिती त्यांना मिळाली. ज्यानंतर त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होईल अशी चर्चा येथे होती.
मात्र त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न करता त्याला संरक्षण देण्याची भूमिका सुरेंद्र भोईर यांनी घेतली. तसेच या कामी त्यांनी पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केली. फक्त मागणीच केली नाही तर पहिला हप्ता म्हणून तात्काळ दोन लाख पन्नास हजार रुपये देण्याच्या सूचना केल्या.
यानंतर संबंधीत तक्रारदाराने याबाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुशंगाने खातरजमा केल्यानंतर ठाणे पथकाने सापळा रचला. तसेच मंगळवारी (ता.९) सायंकाळी सात वाजता ही रक्कम देण्याचे ठरले. त्याप्रमाणे सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर हा प्रभाग समिती कार्यालया बाहेर मोकळ्या मैदानात पोहचला. तो आपल्या कारमध्ये बसला होता.
यावेळी तक्रारदाराने कार जवळ जावून त्यांच्या जवळ असलेले अडीच लाख रूपये सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईर यांच्या हातात दिले. याचवेळी लाचलुचपत पथकाने धाड टाकत भोईर यास रंगेहाथ पकडले. तसेच पुढील चौकशीसाठी शहर पोलीस ठाण्यात आणले. येथे भोईर याची रात्री उशिरापर्यंत चौकशी झाली. तर जबाब नोंदवण्यात आल्यानंतर पहाटे अटक करण्यात आली. दरम्यान आता ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केलेल्या या कारवाईमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.