रत्नागिरी जिल्ह्यात नगराध्यक्ष पदावरून भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे.
भाजपकडून चार तर शिवसेनेकडून तीन महिला उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
Ratnagiri News : कोकणासह तळकोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महायुतीतील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोर्चे बांधणी आणि पक्ष वाढीसह पक्ष फोडाफोडीवरून वाद सुरू आहे. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद वाढला असून भाजप येथे सावध भूमीकेत आहे. याच्या उलट स्थिती रत्नागिरी जिल्ह्यात असून भाजप आणि शिवसेनेत जागावाटपावरून वाद रंगला आहे. राष्ट्रवादी 'वेट अँड वॉच'च्या भूमीकेत दिसत आहे. दरम्यान येथे नगराध्यक्ष पदावरुन भाजप आणि शिवसेनेत जुंपल्याचे समोर येत आहे.
रत्नागिरी नगर पालिकेच्या वॉर्डाचेही आरक्षण जाहीर झाले असून नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. यामुळे हौशे-नवसेंसह राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तसेच आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी दिग्गजांचा पत्ता कट झाला असून दिग्गजांनी नाराज न होता पत्नी किंवा मुलींसाठी उमेदवारी मिळण्यासाठी खटाटोप सुरु केला आहे. पण खरी चुरस पालिकेच्या नगराध्यक्ष पदावरून पहायला मिळत आहे. अद्याप महायुतीत जागावाटपांची चर्चा सुरू झालेली नसून युती करण्यावरून देखील वाद सुरु झाला आहे. अशातच नगराध्यक्ष पदावरुन देखील महायुतीत मीठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.
नगराध्यक्ष पदासाठी महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्येच चुरस पहायला मिळत आहे. सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत तीन महिलांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये स्मितल पावसकर, शिल्पा सुर्वे, समृध्दी मयेकर यांचा समावेश आहे. भाजपकडून शिल्पा पटवर्धन, वर्षा ढेकणे व शिवानी माने (सावंत) यांच्यासह नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वैभवी खेडेकर यांच्या नावाची चर्चा आहे.
दरम्यान शिवसेनेतील बंडखोरी रोखण्याची तारेवरची कसरत पालकमंत्री उदय सामंत यांना करावी लागणार आहे. तर भाजपला देखील इच्छुकांची मनधरणी करावी लागणार आहे. एकीकडे भाजप आणि शिवसेनेने नगराध्यक्ष पदावर दावा केल्याने वाद उफाळण्याची शक्यता असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे.
भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेचा विरोध?
भाजपकडून गराध्यक्ष पदाच्या शर्यतीत चार महिलांची नावे सध्या जोरदार चर्चेत आहेत. ज्यात एक शिवानी माने (सावंत) यांचे आहे. शिवानी माने या भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या कन्या असून त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांच्या सून आहे. यामुळे शिवानी माने यांना उमेदवारी मिळाल्यास येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची त्यांना थेट मदत होऊ शकते. या शक्यतेमुळेच शिवानी माने यांच्या उमेदवारीला शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध होण्याची शक्यता आहे.
1. रत्नागिरीत कोणत्या मुद्द्यावर वाद निर्माण झाला आहे?
भाजप आणि शिवसेनेत नगराध्यक्ष पदावरून वाद निर्माण झाला आहे.
2. किती महिला उमेदवार इच्छूक आहेत?
शिवसेनेकडून तीन आणि भाजपकडून चार महिला उमेदवार इच्छूक आहेत.
3. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे?
राष्ट्रवादी काँग्रेस सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे.
4. हा वाद महायुतीवर काय परिणाम करू शकतो?
हा वाद वाढल्यास महायुतीच्या एकजुटीवर परिणाम होऊ शकतो.
5. या वादाचा स्थानिक निवडणुकीवर काय परिणाम होईल?
भाजप आणि शिवसेनेतील मतभेदांमुळे इतर पक्षांना फायदा होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.