Nitesh Rane  Sarkarnama
कोकण

नितेश राणेंना गोव्याला नेलं पण पोलिसांचं मौनच...

संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे अडकले आहेत.

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे पोलीस कोठडीत आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की न्यायालयीन कोठडी होणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासासाठी राणेंना काल (ता.3) गोव्यात नेण्यात आले होते. याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना पोलिसांनी मौन धारण केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणेंना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. काल सकाळी त्यांना तेथून कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तपास अधिकारी सचिन हुंदळेकर हे राणे आणि त्यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब याची समोरासमोर चौकशी केली. त्यानंतर तपासासाठी पोलीस राणेंना थेट गोव्यात घेऊन गेले. या हल्ल्याचा कट गोव्यात शिजल्याचा पोलिसांना संशय आहे. राणे प्रकरणातील गोवा कनेक्शनबाबत मोठी चर्चा सुरू असताना पोलिसांनी मौन धारण केले आहे.

नितेश राणे यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना आज कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी नितेश राणे यांचे धाकटे बंधू निलेश राणेही न्यायालयात पोचले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर काहीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी न्यायालयाबाहेर दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. पोलिसांची नितेश राणे यांची कोठडीची मुदत वाढवून मागितली आहे. पोलिसांनी नितेश राणे यांचे मोबाईल, सिमकार्ड जप्त केले आहे. आरोपीला पुण्याला नेऊन तपास करणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यावरील युक्तीवाद संपला असून, थो़ड्याच वेळेत न्यायालय यावर निर्णय देणार आहे.

पोलिसांना शरण गेल्यानंतर राणेंना 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता. (Nitesh Rane News)

मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT