Dhairyasheel Patil.jpg Sarkarnama
कोकण

Dhairyasheel Patil News : भाजपची मास्टर खेळी; राज्यसभेसाठी धैर्यशील पाटलांचं नाव, एकाच दगडात दोन पक्षी

Rajya Sabha By Election 2024 : आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन भाजपनं रविशेठ पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ 'सेफ' करून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

Sandeep Chavan

BJP News : राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं विविध राज्यांतील उमेदवारांची यादी आज (ता.20) जाहीर केली. महाराष्ट्रातून पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार रावसाहेब दानवे आदी दिग्गज नेत्यांना मागं सारत भाजपकडून कुणाच्या मनीध्यानी नसताना थेट धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) यांच्या राज्यसभा उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा करतानाच भाजपनं मास्टर खेळी खेळली आहे. तसेच भाजपने या माध्यमातून एका दगडात दोन पक्षी मारले असल्याचे बोलले जात आहेत. राज्यसभेच्या उमेदवारीची घोषणा करताना पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची विरोधकांना धोबीपछाड दिला आहे.

शेकापच्या मोहन पाटलांचे चिरंजीव; 02 वेळा आमदार

राज्यसभेच्या 12 जागांसाठी येत्या 3 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील दोन जागांचा त्यात समावेश आहे. यापैकी भाजपनं आपला एक उमेदवार जाहीर केला आणि ते म्हणजे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याचे माजी आमदार धैर्यशील पाटील! माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत भाई मोहन पाटील यांचे धैर्यशील पाटील हे चिरंजीव.

2009 मध्ये त्यांनी शेकापकडून विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवली आणि ते पेणचे पहिल्यांदा आमदार बनले. त्यानंतर त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवला. या दोन्ही निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या रविशेठ पाटील यांचा पराभव केला.

2019 च्या पराभवानंतर शेकाप सोडला; कमळ धरलं

2009 आणि 2014 असा सलग दोन वेळा पराभव पाहावा लागल्यानंतर रविशेठ पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला. 2019 च्या निवडणुकीत पेण मतदारसंघात शिवसेना-भाजप युती शेकापवर वरचढ ठरली आणि रविशेठ पाटील यांनी शेकापचे धैर्यशील पाटील यांचा पराभव केला. पराभवानंतर रविशेठ पाटील यांनी जसा काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला अगदी त्याचप्रमाणं 2019 च्या पराभवानंतर धैर्यशील पाटील यांनी देखील शेकाप सोडून भाजपत प्रवेश केला.

दोन्ही पाटील भाजपत, काँग्रेस, शेकापची वाताहत!

आधी रविशेठ पाटील आणि त्यानंतर धैर्यशील पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यानं पेण मतदारसंघातली भाजपची (BJP) ताकद वाढली आणि काँग्रेस, शेकापची वाताहत होत चालली. या मतदारसंघातली राजकीय समीकरणंच आता पुरती बदलून गेली. धैर्यशील पाटील यांच्या भाजप प्रवेशानं आगामी काळात रविशेठ पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ अधिक सुरक्षित झाला आहे.

राज्यसभेला धैर्यशील पाटलांचं 'नेम', भाजपचा 'सेफ गेम'

धैर्यशील पाटील आणि रविशेठ पाटील हे एकेकाळचे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आज एकाच पक्षात आहेत. रविशेठ पाटील पेणचे विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन भाजपनं रविशेठ पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ 'सेफ' करून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

एकूणच काय तर धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर पाठवून त्यानं खूष करायचं आणि त्यांच्या ताकदीचा वापर करून रविशेठ पाटील यांना विधानसभेला निवडून आणायचं, ही भाजपची रणनीती यातून दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT