Boisar Update : बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांनी पराभवाचा वचपा काढला आहे. त्यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना पराभवाचा धक्का दिला आहे. मागील निवडणुकीत पाटील यांनीच तरेंना घरी बसवले होते.
विलास तरे यांनी तब्बल 1 लाख 26 हजार 117 मते मिळवली आहेत. त्यांनी राजेश पाटील यांचा 44 हजार 455 मतांनी पराभव केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विश्वास वळवी यांना जेमतेम 50 हजार मते मिळाली आहेत. या विजयामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या मतदारसंघात ठाकरेंवर वरचढ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकुर यांचा दबदबा असलेला हा मतदारसंघ. त्यामुळे आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राजेश पाटील यांचे पारडे सुरूवातीपासून जड वाटत होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विश्वास वळवी तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार विलास तरे रिंगणात होते. खरी लढत पाटील आणि तरे यांच्यातच होईल, असे चित्र होते.
विलास तरे हे याच मतदारसंघाचे ते 2009 आणि 2014 मध्ये बीव्हीएचे आमदार होते. 2019 मध्ये ते शिवसेनेत गेले होते. 2019 च्या निवडणुकीत ते शिवसेनेचेच उमेदवार होते. मात्र, त्यावेळी शिवसेना एकसंध होती. राजेश पाटील यांनी त्यांचा सुमारे तीन हजार मतांनी पराभव केला होता. पराभव झाल्यानंतर ते भाजपमध्ये गेले होते. मागील निवडणूक चुरशीची झाली असली तरी आताची राजकीय स्थिती बदलली होती.
शिवसेनेचे दोन गट पडल्याने पक्षाची मते विभागली गेली होती. त्यामुळे तरे यांना मागील निवडणुकीत मिळालेली मते कायम राहणार का, भाजपची साथ त्यांना मिळणार का, याबाबत उत्सुकता होती. तर पुन्हा एकदा ठाकुर यांच्या करिष्मावर पाटील बाजी मारणार, अशी चर्चा मतदारसंघात होती. उद्धव ठाकरेंचे उमेदवार वळवी यांच्या नावाची सुरूवातीपासून फारशी चर्चा नव्हती. मात्र, अपक्ष उमेदवार नरेश थोडी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी बनली होती.
राजेश पाटील (बीव्हीए) – 78,703
विलास तरे (शिवसेना) – 75,951
संतोष जनाथे (अपक्ष) – 30,952
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.