अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचे कट्टर समर्थक राजा केणी (Raja Keni) यांची उत्तर रायगडच्या (Raigad District) जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली. तर दक्षिण रायगड जिल्हाप्रमुखपदी प्रमोद घोसाळकर (Pramod Ghosalkar) यांना जबाबदारी देण्यात आली आहे. शिंदे यांनी या दोघांनाही नियुक्ती पत्र देत शिवसेनेच्या शिंदे गटाला रायगड जिल्ह्यात नवी उर्जा दिली आहे.
शिवसेनेत शिंदे गटाकडून सध्या पक्षबांधणीवर भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून केणी आणि घोसाळकरांवर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यातून शिंदे गटाने रायगडमध्ये एक प्रकारे विरोधकांना त्यांच्याच शैलीत उत्तर देण्यास सुरुवात केली असल्याचीही चर्चा आहे. याचवेळी शिंदे गटाकडून इतरही नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ता काही दिवसात करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. (Shivsena | Eknath Shinde Group)
शिवसेनेत एकनाथ शिंदे गटाने उठाव केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्ता केल्या होत्या. यावेळी शिवसेनेचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांना सर्वप्रथम पदावरुन काढून टाकत शिंदे गटाला जोरदार धक्का देत कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. या बडतर्फीच्या कारवाईने नवी शिवसेना बॅकफुटवर येईल असे दिसून येत होते.
मात्र, शिंदे गटाला येथील शिवसैनिकांचे समर्थन वाढत गेले. विशेषतः माणगाव, महाड, श्रीवर्धन तालुक्यातील कार्यकर्त्यांना प्रमोद घोसाळकर यांनी विश्वास देत शिंदे गटात रोखून ठेवल. त्याचप्रमाणे अलिबागमध्ये राजा केणी यांनी आपल्या संपर्कातून शिंदे गटाची ताकद वाढवण्यास मदत केली. यावर खुष होऊन पक्षश्रेष्टींनी राजा केणी यांना उत्तर रायगडची जबाबदारी दिली आहे, तर प्रमोद घोसाळकर यांच्यावर दक्षिण रायगडची जबाबदारी देण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांसाठी ही निवड खूप महत्वाची असून रायगडच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात झाली असल्याने शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.