Nitesh Rane News sarkarnama
कोकण

मोठी बातमी : नितेश राणेंना न्यायालयाचा दिलासा

संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने राणेंची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. राणेंच्या जामिनासाठीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

नितेश राणे यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना आज कणकवली दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी नितेश राणे यांचे धाकटे बंधू निलेश राणेही न्यायालयात पोचले. न्यायालयाच्या निर्णयानंतर काहीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी न्यायालयाबाहेर दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. पोलिसांची नितेश राणे यांची कोठडीची मुदत वाढवून मागितली. पोलिसांनी नितेश राणे यांचे मोबाईल, सिमकार्ड जप्त केले आहे. आरोपीला पुण्याला नेऊन तपास करणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. पोलीस कोठडी वाढवून देण्याची सरकारी पक्षाची मागणी न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाने राणेंची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. यामुळे आता न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे राणेंचे वकील सतीश मानेशिंदे आणि संग्राम देसाई यांनी जाहीर केले आहे.

पोलिसांना शरण गेल्यानंतर राणेंना 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला होता. (Nitesh Rane News)

मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT