Deepak Kesarkar, Narayan Rane Sarkarnama
कोकण

Deepak Kesarkar : केसरकरांचा राणेंना सपोर्ट; सामंतांवर कुरघोडी, रत्नागिरी-सिंधुदुर्गबाबत काय म्हणाले ?

Sunil Balasaheb Dhumal

Sindhudurg Political News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत महायुतीतील शिवसेना आणि भाजपने दावा सांगितल्याने तेढ निर्माण झाला आहे. दोन्ही पक्ष या जागेवरील दावा सोडण्यास तयार नसल्याने ही जागा नेमकी कुणाला मिळणार, याकडे लक्ष आहे.

यातच शिंदे गटाचे नेते, मंत्री दीपक केसरकरांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ही जागा लढवण्यासाठी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. केसरकरांच्या भूमिकेने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या जात आहेत. मात्र, त्यांनी स्वपक्षातील नेते मंत्री उदय सामंतांवर कुरघोडी केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीत काही जागांचा तिढा सोडवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नाकीनऊ आले आहे. त्यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपने दावा सांगितला आहे. येथून भाजप माजी मुख्यमंत्री नरायण राणे यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.

तर शिवसेना शिंदे गटाचे नेते, उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत यांनीही या जागेवर दावा सांगितला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वारंवार बैठका झाल्या, पण मार्ग निघला नसल्याने महायुतीत चांगलीच रस्सीखेच वाढल्याचे दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या स्थितीत शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) सिंधुदुर्ग येथील पत्रकार परिषदेत भाजपच्या राणे यांना समर्थन देणारे विधान केले आहे. नारायण राणे हे एक व्यक्ती नाहीत तर त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याचा विकास अवलंबून आहे. लोकसभेत निवडून दिले तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मंत्रिपद फिक्स आहे. त्यावरच जिल्ह्याचा भविष्यातील विकास होणार आहे.

त्यामुळे जिल्ह्याला मिळणारी केंद्रीय मंत्रिपदाची संधी घालवायची का, नाही याचा जनतेने विचार करावा, असे सूचक विधान केसरकरांनी केले आहे. एकेकाळी कट्टर विरोधक असलेल्या केसरकरांनी थेट राणेंची बाजू घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

सध्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप अडून बसले आहेत. पूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता, त्यामुळे शिंदे गटाचे किरण सामंतांनी येथून लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असले तरी शिंदे गटाचे नेते केसरकरांनी भाजपच्या बाजूने केलेले विधान चर्चेचे ठरले आहे.

दरम्यान, या मतदारसंघाबाबत काही दिवसांपूर्वी नारायण राणे (Narayan Rane) आणि मंत्री उदय सामंत यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. त्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT