Dharashiv News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन दहा दिवस उलटले तरी महाविकास आघाडी व महायुतीचे जागावाटप पूर्ण झालेले नाही. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने इच्छुक उमेदवारांची घालमेल सुरु आहे. त्यातच राजकीय मंडळींच्या आरोप-प्रत्यारोपामुळे ऐन निवडणुकीपूर्वीच वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे महायुतीमधील घटक पक्षात एका-एका जागेवरून रस्सीखेच सुरु आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघावर महायुतीमधील तीन घटक पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विरोधात कोण मैदानात उतरणार याची उत्सुकता लागली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार महायुतीने केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात येत्या काळात तगडा उमेदवार उतरविण्याची तयारी सुरु आहे. या मतदारसंघात महायुतीमध्ये कोण लढणार यावरून तिढा मात्र कायम आहे. (Dharashiv Lok Sabha News )
या जागेवर भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दावा केला आहे. या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच ही जागा भाजपला सुटली तर 'निवडून येण्याची शक्यता’ या एकमेव निकषावर सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव चर्चेत आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय निवृत्त सनदी अधिकारी व महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशचे (मित्रा) सीईओ प्रवीणसिंह परदेशी यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी पूर्ण केली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
दरम्यान, सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रवीणसिंह परदेशी यांनी निवडणूक लढविण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'निवडणूक लढविण्याबाबत वरिष्ठांच्या सूचना आल्यास त्याचे पालन करेन', असे सांगत निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी परदेशी यांनी दर्शवली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
धाराशिव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रवीणसिंह परदेशी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र, धाराशिवची ही जागा भाजपला सुटल्यानंतर ते अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यामुळे जागावाटप कधी पूर्ण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इच्छुकांची मांदियाळी
या मतदारसंघात भाजपकडून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्यासह माजी आमदार बसवराज पाटील (Baswraj Patil), जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, नितीन काळे, बसवराज मंगरूळे, सुधीर पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawnat) यांचे पुतणे धनंजय सावंत, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Ncp) प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार हे इच्छुक आहेत.