Devendra Fadnavis Sarkarnama
कोकण

Video Devendra Fadnavis : कोकणातून महायुतीला तडीपार करणारेच तडीपार झालेत; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Sunil Balasaheb Dhumal

Konkan Political News : लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर कोकणात मोठी नामुष्की ओढावली आहे. माजी खासदार विनायक राऊत यांच्या पराभवामुळे कोकणातून ठाकरे गट बॅकफूटवर आला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपचे नारायण राणे विजयी झाले. त्यावर बोलताना, कोकणातून महायुतीला तडीपार करणारेच आता तडीपार झाले आहेत, अशी टीका करून फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच राज्यात विधानपरिषद आणि विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाण्यात महायुतीचा मेळावा फडणवीसांच्या Devendra Fadnavis उपस्थित पार पडला. ते म्हणाले, महायुतीला कोकणात मोठे यश मिळाले आहे. मात्र काही लोकांनी, आम्ही कोकणातून महायुतीला तडीपार करू, अशी गर्जना केली होती. आता जनतेने त्यांनाच तडीपार केले आहे.

कोकणातील साडेसहा जागांपैकी (मावळचा काही भाग कोकणात येतो) साडेपाच जागांवर महायुतीच्या निवडून आल्या आहेत. भिवंडीत मात्र धक्कादायक पराभव झाला आहे. तिकडे काय घडले ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मुंब्र्यात घडले तेच भिवंडीत घडले आहे. आता त्यावर काम करून चुका सुधारू, असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले.

कोकणने लोकसभेत आपल्याला साथ दिली. आता कोकण पदवीधर मतदारसंघातही पुन्हा एकदा कोकणचा आशीर्वाद मिळणार आहे. येथून भाजपचा सिटिंग आमदार असल्याने राज ठाकरेंनीही आपला उमेदवार मागे घेतला. याता आपण महायुती म्हणून काम करत आहोत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कोकण पदवीधर मतदारसंघातील ठाणे आणि रायगडमध्ये सर्वाधिक मतदार आहेत. त्यातच आपले उमेदवार निरंजन डावखरे Niranjan Davkhare यांनी गेल्या 12 वर्षांत चांगले काम केले आहे. त्यांचा संपर्कही मोठा आहे. सभागृहात एक जागरुक सदस्य म्हणून ते काम करतात. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने पेन्शनसह इतर अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याकडेही फडणवीसांनी लक्ष वेधले.

लोकसभेत विरोधकांनी मतदारांची दिशाभूल करत वेगळीच चर्चा घडवून आणली. खोटे बोलून मतदारांना भुलवले. आता विधानपरिषदेत आपले चारही जागांवर आपले उमेदवार आघाडीवर आहेत. ते 1 जुलै रोजी येणाऱ्या निकालात स्पष्ट होईल, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT