Ravindra Chavan-Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ramdas kadam Sarkarnama
कोकण

Devendra Fadnavis : शिवसेना नेत्यावर देवेंद्र फडणवीस नाराज; एकनाथ शिंदेंशी बोलण्याचा गर्भित इशारा

Vijaykumar Dudhale

Mumbi, 19 August : शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम वारंवार टोकाचे बोलतात, त्यामुळे आमचीही मनं दुखावली जातात. कारण आम्हीही शेवटी माणसं आहोत. रामदास कदम यांच्या टीकेला उत्तर देताना आम्हालाही 50 गोष्टी बोलता येतील. पण, जे मोठे नेते आहेत, त्यांनी काहीतरी पथ्य पाळली पाहिजेत.

भारतीय जनता पक्षाला असं वारंवार बोलणं, हे आम्हाला मान्य नाही. या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीत अंतर्गत धूसफूस असल्याचे पुढे आले आहे.

भाजपला जर राक्षसी महत्वकांक्षा असेल तर त्यांनी युती तोडावी आणि त्यांनी त्यांचं लढावं. आम्ही आमचं स्वतंत्र लढतो, असे आव्हान रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दापोलीतील स्थानिक राजकारणावर बोलताना दिले होते. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर देताना रामदासभाईंच्या विधानावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले आहे.

फडणवीस म्हणाले, भाजप मंत्र्यांवर सतत आरोप करणं, कुठल्या युती धर्मात बसतं. रामदास कदम यांचे काही म्हणणं असेल तर त्यांनी युतीच्या अंतर्गत बैठकीत मांडले पाहिजे. प्रत्येक वेळी भाजपला आणि भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं चांगलं नाही. त्यातून चांगली भावना तयार होत नाही. रामदासभाईंचं काय म्हणणं आहे, आम्ही समजून घेऊ आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

रामदास कदम काय म्हणाले होते?

माझ्या मनात दुःख आहे. रामाचा वनवास 14 वर्षांनंतर संपला; पण आमचा, कोकणावासियांचा वनवास अजूनही कायम आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या वर्षी या रस्त्याचे काम पुढील वर्षीचे गणपती येईपर्यंत पूर्ण केले जाईल, असे सांगितले होते. पण आजही पुणे-गोवा रस्त्याची वाईट अवस्था आहे. गेली 14 वर्षांपासून हा रस्ता तसाच आहे. आम्ही काय पाप केले आहे, असा सवाल रामदास कदमांनी केला होता.

बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या पाहणी दौऱ्याबाबत कदम म्हणाले, नुसतीच चमकोगिरी करण्यात काय अर्थ आहे. अनेक ठिकाणी रस्ताच नाही, नुसतेच खड्डे आहेत. नुसते पाहणी दौरे कशासाठी? असा सवालही रामदास कदमांनी उपस्थित केला होता.

उलट देवेंद्र फडणवीस यांनी या बांधकाम मंत्र्यांचा राजीनामा घ्यायाला पाहिजे. हा कुचकामी मंत्री आहे. कोकणाचे हाल आम्हाला बघवत नाहीत. कोकणाचे लोक आम्हाला विचारतात की रामदास भाई तुम्ही काय करताय. त्यामुळे आम्हीही किती सहन करायचं, आम्हालाही मर्यादा आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT