Kagal Assembly Election : हसन मुश्रीफांवर नाराजी?; महाविकास आघाडी देणार समरजितसिंह घाटगेंना बळ!

Hasan Mushrif Vs Samarjeetsinh Ghatge : कागल मतदारसंघात हसन मुश्रीफ यांची महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ऑफर आल्याचे सांगितले जाते.
Hasan Mushrif | Samarjeetsinh  Ghatge
Hasan Mushrif | Samarjeetsinh GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 19 August : शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर राष्ट्रवादीतून फुटून अजित पवार गट युतीसोबत सत्तेत सामील झाला. या दोन्ही पक्षाच्या आमदारांबाबत मतदारांमध्ये नाराजी असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले.

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी चांगल्याच झुंजवल्या. एक जागेवर महाविकास आघाडीला यश आले तर दुसऱ्या जागेवर पराभव स्वीकारावा लागला.

लोकसभेतील यश हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी टॉनिक ठरले आहे. त्यामुळे महायुतीतील नाराजांना महाविकास आघाडीकडे वळविण्याचा प्रयत्न नेतेमंडळींचा सुरू आहे. कागल विधानसभा मतदारसंघात (Kagal Assembly Constituency) पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप नेते समरजितसिंह घाटगे (Samarjeet Ghatge) यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ऑफर आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घाटगे काय भूमिका घेणार, याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. असे झाल्यास महायुतीला मतदार डच्चू देऊ शकतात.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर अडीच वर्षाच्या कार्यकाळात शिवसेना भाजपसोबत गेली. कोल्हापूर जिल्ह्यातील हसन मुश्रीफ यांच्या पाठीमागे ईडीची पीडा लागल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीत सहभागी झाले.

त्यामुळे मतदारांमध्ये मुश्रीफांबद्दल नाराजी पसरली आहे. आरोग्य दूत आणि कागलचा श्रावणबाळ म्हणून हसन मुश्रीफ यांची ओळख असली तरी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर त्यांच्यावर जनमानसातून प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे व शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे यांची कोंडी झाली आहे. सध्या यावर कोणतेही भाष्य घाटगे यांनी केले नसले तरी त्यांची सावध पावले बरंच काही सांगून जात आहेत.

सध्या घाटगे यांच्याकडून थेट मुस्लिम समाजावर टीका होत नसली तरी मुश्रीफ हेच व्हायबल आल्याचे दिसून येते. लिंगनूर येथील मेळाव्यात त्यांनी थेट अवलाद काढत विरोधकांवर टीका केली आहे. वास्तविक महाविकास आणि महायुतीतील ताकदवान नेतृत्व मुश्रीफ यांच्या बाजूने असताना त्यांनी थेट विरोधकांवर टीका केली आहे.

Hasan Mushrif | Samarjeetsinh  Ghatge
Mahayuti Dispute : महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी; राष्ट्रवादी अन्‌ तटकरे विश्वासघातकी, शिंदेसेनेच्या आमदाराचा आरोप

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कागलमधून भाजपची उमेदवारी न मिळाल्याने समरजित घाटगे अपक्ष उभे राहिले होते. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत ८८ हजार ३०३ मते घेतली होती. संजय घाटगे यांना ५५ हजार ६५७ मते मिळाली होती. तर, १ लाख १६ हजार ४३६ मते मिळवणारे हसन मुश्रीफ हे २८ हजार १३३ मताधिक्य घेऊन पाचव्यांदा आमदार झाले.

लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास महायुतीतील तीनही नेते कागल तालुक्यातील होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे मताधिक्य संजय मंडलिक यांना मिळाले नाही. जनतेने दिलेला कौल हा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीसाठी धोक्याचा इशारा देणारा ठरला आहे.

कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक दलित, अल्पसंख्यांक, मतदार आहेत. पालकमंत्री मुश्रीफ हे कार्यसम्राट असले तरी हा मतदार महायुतीकडे आकर्षित होणार नाही, हे लोकसभेवरून स्पष्ट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पारड्यात ही मते जाण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुरुस्थानी मानून भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते म्हणून केवळ मुश्रीफ यांच्याकडे पाहू शकतो. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीला प्रबळ उमेदवार शोधणे हे सध्याच्या घडीला अशक्य आहे. भाजपचे नेते आणि समरजितसिंह घाटगे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. त्यामुळे घाटगे यांनाच उमेदवारीची गळ महाविकास आघाडीकडून घातली जात आहे.

संजय घाटगेंना मुश्रीफांची रसद

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध अपक्ष समरजित घाटगे अशी निवडणूक गाजली. एकास एक निवडणूक झाली असती तर घाटगे विजयी झाले असते. मात्र, माजी आमदार संजय घाटगे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यामागे मुश्रीफ यांनी रसद पुरवली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मत विभाजन होऊन पालकमंत्री मुश्रीफ यांचा विजय सुकर झाला.

Hasan Mushrif | Samarjeetsinh  Ghatge
Abhijeet Patil : अभिजीत पाटलांचं ठरलं; माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवणार, पक्ष अद्यापही गुलदस्त्यात

मुश्रीफांनी ती नस ओळखली अन्‌ घाटगेंनी पाठिंबा दिला

यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे. मातोश्रीवरील नेतेही हट्टाला पेटले आहेत. विधानसभा निवडणुकीचे नेतृत्वच मातोश्रीवर दिल्याने प्रत्येक जागेवर त्यांची करडी नजर आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक मुश्रीफ विरुद्ध घाटगे असा होण्याची शक्यता आहे. मातोश्रीवरून या मतदारसंघातून संजय घाटगे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे. ही काळाची पाऊले ओळखूनच संजय घाडगे यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com