Diveagar Accident Sarkarnama
कोकण

Diveagar Accident : दिवेआगर समुद्रकिनारी 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू; विनर्स अकॅडमीच्या संस्थापक शिक्षकासह पाच जणांवर गुन्हा

Five booked over alleged negligence Diveagar drowning deaths eight students from Alandi : सहलीतील कथित निष्काळजीपणाचा आरोप; मृत विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीनंतर दुर्घटनेच्या 18 दिवसांनी पोलिसांची कारवाई.

Pradeep Pendhare

Winners Academy Case : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी बुडून आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी विनर्स अकॅडमीच्या संस्थापक शिक्षकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहलीचे योग्य नियोजन न करणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मृत विद्यार्थी राजवीर वाहिले यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी, घटनेनंतर 18 दिवसांनी पोलिसांनी ही कारवाई केली.

आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथील विनर्स अकॅडमीचे संस्थापक शिक्षक अमर आडक यांच्यासह मृणाल नरसखेडे, सबा महबूब इनामदार, शिल्पा अमर आडक आणि वैष्णवी मृणाल नरसखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष आवटी करीत आहेत. तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विनर्स अकॅडमीच्या अकरावीतील विद्यार्थ्यांना (Student) रायगड किल्ला आणि श्रीवर्धन परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर सहलीसाठी नेण्यात आले होते. मात्र, या सहलीचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यात आले नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

तक्रारीनुसार, रायगड किल्ल्यावरील रोपवे बंद असतानाही विद्यार्थ्यांकडून रोपवेच्या तिकिटाचे पैसे घेण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना रोपवेऐवजी पायरी मार्गाने किल्ल्यावर नेण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांना श्रीवर्धन समुद्रकिनारी न नेता दिवेआगर येथील तुलनेने कमी वर्दळ असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर नेण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना पोहता येत नसल्याची माहिती शिक्षकांना होती. असे असतानाही समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी आणि सहलीचे योग्य नियोजन करण्यात आले नाही, असा आरोप मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. नियोजनातील कथित हलगर्जीपणामुळेच आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहलीचे नियोजन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेली व्यवस्था आणि दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा तपास सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता आणि संबंधितांची जबाबदारी तपासातून स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT