Deepak Kesarkar Sarakrnama
कोकण

Deepak Kesarkar : तब्बल अकरा वर्षांनंतर झालेल्या आमसभेत राडा, केसरकरांच्या समोरच NCPSP च्या नेत्याला धक्काबुक्की; राजकीय वातावरण तापले

Dodamarg Aam Sabha Slash : तब्बल अकरा वर्षांनंतर झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील आमसभेत शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याला धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे.

शिवप्रसाद देसाई

Sindhudurg Political Clash News : तब्बल अकरा वर्षांनंतर दोडामार्ग तालुक्यात आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेची सुरुवातच गदारोळाने झाली. विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष रविकिरण गवस यांच्या अंगावर धावत जात शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याने सभेच्या सुरुवातीलाच काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने त्यांनी देखील या प्रकाराची भर सभेत दिलगिरी व्यक्त करून सभा पुढे चालविली. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात देखील चर्चा रंगली.

तालुक्यातील विविध समस्या मांडण्यासाठी दरवर्षी आम सभेची आयोजन केले जाते. मात्र गेल्या अकरा वर्षात तालुक्यातील ज्वलंत प्रश्नावर आमसभा झालीच नाही. यामुळे नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे खंत वारंवार उपस्थित केली जात होती. मात्र, पंचायत समितीची नूतन कार्यकारणी कार्यरत झाल्यानंतर दोडामार्ग तालुक्याची आमसभा आयोजित करण्यात आली.

मात्र, आमसभेच्या सुरुवातीलाच आमदार दीपक केसरकर हे प्रस्तावना मांडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यावरून अक्षेप घेतला. गवस यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली असताना त्यांनी आम सभेच्या अजेंडा कसा काय काढला असा प्रश्न उपस्थित केला.

यावेळी सभेचे अध्यक्ष केसरकर यांनी त्यांना खाली बसण्याची सूचना केली. परंतु, त्यांनी हा विषय वारंवार लावून धरल्याने शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर धाऊन जात धक्काबुक्की केली. यावेळी पोलिस प्रशासनाने हस्तक्षेप करत दोन्हीं बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तर आमदार केसकर व्यासपीठावर असताना त्यांच्या समक्ष घडलेल्या या प्रकाराची त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

तसेच सभेचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे आणि नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळावे, यासाठी वातावरण शांत ठेवण्याचे आवाहन करत सभा पुढे चालविण्याची सूचना केली. आमदारांच्या सूचनांचे पालन करत सभा पुन्हा चालू करण्यात आली. मात्र, या प्रकारामुळे विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सत्ताधारी पक्षाची ही दडपशाही असल्याचा आरोप केला आहे.

सभा शास्त्र माहीत नसल्याने गोंधळ - केसरकर 

आम सभेच्या सुरुवातीलाच झालेला गोंधळ ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. काही दिवसापूर्वी पुण्यातून इथे आलेल्या मुलाने गदारोळ घालण्यास सुरुवात केली. ज्याला सभा शास्त्राचे ज्ञान नाही त्या मुलाची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे मी प्रास्ताविक करीत असताना त्याला बऱ्याचवेळा सांगितले की, तुम्हीं खाली बसा नंतर तुमच्या विषयावर बोलू. असे वारंवार सांगूनही त्याने ऐकले नाही. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आणि गोंधळ उडाला.

सातत्याने उठून तो प्रश्न करीत होता त्यामुळे सभेच कामकाज चालू करण्यास अडथळा निर्माण होत होता. घडलेल्या घटनेची मी स्वतःहून दिलगिरी व्यक्त करून सभेचे कामकाज चालू केले. आणि पुढील सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. असे असतानाही सभा संपल्यानंतर ते प्रतिक्रिया देत असतील तर ते चुकीचे आहे. त्यांनी, निषेध करून बाहेर जायला हवं होतं. गदारोळानंतर त्या मुलाला बोलण्याची चारवेळा संधी देण्यात आली आणि तो बोलला देखील. याचा अर्थ स्पष्ट होतो की त्याला सभा शास्त्र माहीत नसल्याने त्याने हा गोंधळ निर्माण केल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट सांगितले.

लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

आम सभेमध्ये प्रश्न उपस्थित करीत असताना जो गदारोळ करण्यात आला तो दीपक केसरकर यांनी सांभाळलेली आणि दोडामार्ग तालुका उध्वस्त करणारी ही मंडळी आहे, हे या सभेतून स्पष्ट दाखवून दिलेले आहे. आम सभेबाबत पंचायत समितीने पत्र काढले आहे. आणि, त्या लेटर पॅडवर ज्यांची सही आहे, त्या गटविकास अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. असे असतानाही त्यांच्या सहीनुसार आमसभा कशी काय होते असा प्रश्न विचारला असता केसरकरांचे कार्यकर्ते माझ्यावर तुटून पडले आणि माझ्यावर धावून आले.

हा सर्व कट राजू निंबाळकर यांनी आखलेला असेल, असा आरोप करत गवस यांनी, आमचा आवाज दाबण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला असल्याचा दावा केला. तसेच यामागचे कारणही त्यांचे अवैध धंदे आहेत, त्यांची काही कारस्थाने आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना सांभाळून घेण्यासाठी माझा आवाज दाबण्याचा त्यांनी हा प्रयत्न केला आहे. ही लोकशाही राहिलेली नाही ही हुकूमशाही झालेली आहे. त्यामुळे या प्रकाराचा आपण निषेध करतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी विधानसभा मतदान संघाचे उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी सांगितले.

संविधान पायदळी तुडविले

अध्यक्षस्थानी असलेल्या आमदार दीपक केसरकर यांनी जारी सबुरीने घेतले असले तरी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरायला पाहिजे होते. प्रदीर्घ काळानंतर लावण्यात आलेलेली आमसभा पार पाडावी म्हणून आम्ही देखील सबुरीने घेतलं. पण आता असे प्रकार भविष्यात कधीही खपवून घेतले जाणार नाहीत. असा प्रकार करून त्यांनी संविधान पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आता त्यांना भेट म्हणून संविधानाची एक प्रत देणार असल्याचेही काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक बाबू गवस यांनी सांगितले.

आज झालेल्या आम सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हातघाईवर येऊन धक्काबुक्की करण्याचा जो प्रकार केला तो अत्यंत निंदनीय आहे. आपले विचार मांडण्याची स्वतंत्रता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आहे. आणि ही स्वतंत्रता भंग करण्याचे काम शिंदेच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. केसरकरांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ही सभा हाताळली पण तरीही तेथे वाद झाला. यामुळेच त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. या घडलेल्या प्रकाराची आम्हीं विरोधी पक्षाचे पदाधिकारी निषेध करत असल्याची प्रतिक्रिया उबाठा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय गवस यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT