

माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांना सावंतवाडी व वेंगुर्ले पालिकांमध्ये पराभवाचा दुहेरी धक्का बसला आहे.
सावंतवाडी हे केसरकरांचे होमग्राऊंड मानले जात होते, मात्र यावेळी तेथे भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना अशी थेट लढत झाली.
या निकालामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे संकेत मिळत आहेत.
Sindhudurg News : माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांना सावंतवाडी आणि वेंगुर्ले अशा दोन पालिकांमध्ये पराभवाचा डबल धक्का बसला आहे. सावंतवाडी हे त्यांचे 'होमग्राऊंड' असूनही त्यांना येथे भाजपला रोखता आलेलं नाही. त्यामुळे येथे त्यांच्या दीर्घकालीन करिश्म्याला धक्का बसला असून सावंतवाडीत नवे सत्ताकेंद्र तयार होताना दिसत आहे. येथे नव्याने उदयास आलेल्या नेतृत्वाकडूनही आता दीपक केसरकर यांना निष्प्रभ कारकीर्द!म्हणून डिवचले आहे. त्यामुळे किंगमेकर! खरा किंगमेकर! वन अँड ओन्ली किंगमेकर!! अशी त्यांची टॅग लाइनही आता विशाल परब नेत असल्याचे दिसत आहे.
माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांना सावंतवाडी आणि वेंगुर्ले अशा दोन पालिकांमध्ये पराभवाचा डबल धक्का बसला आहे. सावंतवाडी हे त्यांचे 'होमग्राऊंड' आहे. दीर्घकाळ या शहरावर केसरकर यांचा करिश्मा राहिला आहे. गेल्यावेळी झालेली पोटनिवडणूक याला काहीशी अपवाद म्हणता येईल. यावेळी येथील पालिकेसाठी भाजप विरुध्द शिंदे शिवसेना असा थेट मुकाबला झाला.
भाजपने राजघराण्याला राजकारणात आणत केसरकरांसमोर आव्हान उभे केले होते. युवराज्ञी श्रध्दाराजे भोसले यांनी प्रचारात चांगली वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे भाजप विरुध्द केसरकर यापेक्षा राजघराणे विरुध्द केसरकर असे चित्र निर्माण झाले होते. येथे भोसले यांनी चांगल्या मताधिक्यासह विजय मिळविला आहे. भाजपने ११ नगरसेवकपदांसह सत्ता मिळविली असून, केसरकरांच्या शिंदे शिवसेनेला ७, ठाकरे शिवसेनेला आणि काँग्रेसला प्रत्येकी १ नगरसेवकपद मिळाले.
भाजपने श्रध्दाराजे भोसले यांच्या रुपाने राजघराण्याला दिलेल्या उमेदवारीची खेळी प्रचार काळातच सरस ठरत असल्याचे दिसत होते. या तुलनेत शिंदे शिवसेनेचे उमेदवार प्रचारात कमी प्रभावी ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर केसरकर स्वतः मैदानात उतरले. त्यांनी शहरवासीयांना भावनिक आवाहन केले. शेवटच्या टप्प्यात मल्टिस्पेशालीटी रुग्णालयासाठी जागा, मोती तलावाविषयी न्यायालयीन खटला आदी मुद्द्यावरून थेट राजघराण्याला लक्ष्य केले. भाजपवर पैसे वाटपाचाही आरोप केला. त्यांच्या आरोपांना भाजपकडूनही उत्तर देण्यात आले.
असे असले तरी दोन्ही पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी सगळ्या नीतींचा वापर केला. त्यामुळे चुरस वाढेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. गेल्या पोटनिवडणुकीत केसरकरांच्या पॅनेलला संजू परब यांच्या नेतृत्वाखालील भाजपने पराभव दाखवला होता. यावेळी परब आणि केसरकर एकत्र होते. त्यामुळे भाजपसाठी ही लढाई सोपी नव्हती. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रध्दाराजे यांनी प्रचारात घेतलेली आघाडी, भाजपने केलेले नियोजन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नीतेश राणे यांनी सावंतवाडीत लावलेली ताकद याच्या जोरावर भाजपने सत्ता खेचून आणली.
केसरकर यांच्याच मतदारसंघात असलेल्या वेंगुर्लेमध्ये सुध्दा भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. तेथे नगराध्यक्षपदी भाजपचे दिलीप गिरप विजयी झालेच; पण त्याबरोबरच २० पैकी १५ नगरसेवक पदे या पक्षाकडे आली आहेत. येथे शिंदे शिवसेनेला अवघी १ जागा मिळाली. ठाकरे शिवसेना ४ नगरसेवक पदांसह दुसर्या क्रमांकावर राहिली. सावंतवाडीसह येथेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा झाली.
तरीही झालेला हा दारूण पराभव केसरकरांसाठी आणखी एक मोठा धक्का म्हणावा लागेल. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची रणनीती भाजपसाठी फायद्याची ठरली. दळवी हे पालकमंत्री राणे यांचे सगळ्यात जवळचे समर्थक मानले जातात. त्यामुळे या यशाचे श्रेय राणेंकडे जाते. अर्थात भाजपचे उमेदवार गिरप यांची शांत, संयमी आणि सर्व समावेशक प्रतिमा या विजयात महत्त्वाचे योगदान देणारी ठरली.
सावंतवाडीत नवे सत्ताकेंद्र
सावंतवाडी शहराचे राजकारण गेली कित्येक वर्षे दीपक केसरकर यांच्या भोवती फिरणारे राहिले आहे. आतापर्यंतच्या त्यांच्या विधानसभेच्या प्रत्येक विजयात या शहराचा मतांचा वाटा मोठा राहिला आहे. केसरकरांचा विधानसभेच्या राजकारणात उदय होण्याच्या आधी काँग्रेसच्या माध्यमातून राजघराण्याकडे सत्ताकेंद्र होते. शिवरामराजे भोसले यांनी दीर्घकाळ या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले.
असे असले तरी त्यांच्या विजयात शहरापेक्षा ग्रामीण भागातील मतांचा प्रभाव जास्त असायचा. आता नगराध्यक्ष पद पूर्ण सत्तेसह युवराज्ञी श्रध्दाराजे यांच्याकडे गेल्याने शहरात एक नवे सत्ताकेंद्र तयार झाले आहे. युवराज लखमराजे हे भाजपच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्याकडे राज्यस्तरावरील संघटनात्मक बळ पदही दिले गेले आहे. ते भाजपमध्ये आले तेव्हा कधीतरी विधानसभेच्या स्पर्धेत आघाडी घेतील, असा अंदाज वर्तवला जात होता. या पार्श्वभूमीवर शहरातील सत्ताधारी बदलण्याचा हा घटनाक्रम राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा म्हणता येईल.
1. दीपक केसरकरांना कोणत्या पालिकांमध्ये पराभव झाला?
सावंतवाडी आणि वेंगुर्ले या दोन्ही पालिकांमध्ये पराभव झाला.
2. सावंतवाडी केसरकरांसाठी महत्त्वाची का होती?
सावंतवाडी हे त्यांचे होमग्राऊंड असून दीर्घकाळ त्यांचा प्रभाव होता.
3. यावेळी सावंतवाडीत कोणती थेट लढत होती?
भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना अशी थेट लढत झाली.
4. मागील निवडणुकीत काय वेगळं होतं?
मागील पोटनिवडणूक हा अपवाद मानला जात होता.
5. या निकालाचा राजकीय अर्थ काय आहे?
केसरकरांचा प्रभाव कमी होत असून जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात होत असल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.