Kankavli Woman Police Constable Smita Mane Death Case  Sarkarnama
कोकण

Sindhudurg Police : महिला हवालदार मृत्यू प्रकरणात कॉन्स्टेबल पतीवर गुन्हा दाखल; सिंधुदुर्ग पोलिस दलात खळबळ

Sindhudurg Woman Police Constable Case : कणकवली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या स्मिता माने यांचा मृतदेह बिडवाडी-हुंबरणे परिसरातील जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला होता.

Aslam Shanedivan

Kankavli News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला हवालदार स्मिता सचिन माने यांचा मृतदेह बिडवाडी-हुंबरणे परिसरातील जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला होता. या प्रकरणी आता त्यांचे पती आणि पोलिस शिपाई सचिन माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्मिता यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा, तसेच चारित्र्याच्या संशयावरून त्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्या बहिणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केला आहे. पोलिस दलातील कर्मचाऱ्याविरुद्धच गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, स्मिता यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

बेपत्ता झाल्यानंतर जंगलात आढळला मृतदेह

स्मिता माने गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होत्या. त्यानंतर त्यांचा मृतदेह बिडवाडी-हुंबरणे येथील जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. या घटनेनंतर त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला. स्मिता यांच्या मृत्यूला त्यांचे पती सचिन माने जबाबदार असल्याचा आरोप त्यांची बहीण रेश्मा जाधव (रा. हुंबरट-पिंपळवाडी) यांनी फिर्यादीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे सचिन माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केल्याचा आरोप

फिर्यादीनुसार, स्मिता बेपत्ता असल्याची माहिती सचिन माने यांनीच रेश्मा जाधव यांना दिली होती. त्यानंतर रेश्मा या माने यांच्या घरी गेल्या असता, घरातील फरशीवर लांब केस पडलेले दिसले. या बाबीवरून स्मिता यांना मारहाण झाली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. स्मिता यांचा मुलगा सार्थक याने दिलेल्या माहितीनुसार, सचिन यांनी रात्री स्मिता यांना पट्ट्याने मारहाण केली होती. त्यानंतर स्मिता या बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्या होत्या, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सचिन यांच्या कथित शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून स्मिता यांनी आत्महत्या केली असावी किंवा त्यांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता असल्याचेही रेश्मा यांनी तक्रारीत म्हटले आहे. हे सर्व आरोप असून त्यांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे बाकी आहे.

घराची तपासणी; दोघांचे मोबाईल जप्त

या प्रकरणाचा कसून तपास करण्यात यावा, अशी मागणी पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर कुडाळचे पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी स्मिता माने यांच्या घराची तपासणी केली. तपासाच्या अनुषंगाने संशयित सचिन माने आणि स्मिता माने यांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. स्मिता यांचा मृतदेह कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, सचिन माने काल दिवसभर पोलिस ठाण्यात होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे का आणि त्यांच्याकडून कोणती माहिती मिळाली, याबाबत तपासी अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे स्मिता माने यांच्या मृत्यूमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT