Navi Mumbai News : वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सध्या नवी मुंबईतील यूडीसीपीआर आणि क्लस्टरच्या मुद्द्यावरून वाद होताना दिसत आहे. या वादामुळे महायुतीत तणाव निर्माण होईल अशी सध्याची राजकीय स्थिती असतानाच आता पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. गणेश नाईक यांन, "जनतेला गृहीत धरून कोणी नाटक करत असेल, तर त्यांना तमाशा दाखवण्याची ताकद आमच्यात आहे," असा इशारा दिला आहे. ते सानपाडा येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आठ दिवसांच्यापूर्वीच अतिधोकादायक नसलेल्या तसेच ३० वर्षे पूर्ण न झालेल्या इमारतींनाही क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्यावर आरोप करत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली होती. क्लस्टर पुनर्विकास योजनेला आक्षेप घेतला होता. याचवेळी त्यांनी, नवी मुंबईतील नव्या यूडीसीपीआरमुळे एफएसआय वाढल्यास शहराच्या नियोजनावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली होती. तर माझ्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेऊ देणार नाही, असा दम भरला होता. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
या गोष्टीला आता काहीच कालावधी होत असतानाच आता यूडीसीपीआर आणि क्लस्टरच्या मुद्द्यांवर गणेश नाईक यांनी थेट सरकारलाच घेरलं आहे. तसेच जनतेला कोणीही गृहीत धरू नये, असा इशारा दिला आहे. "जनता सर्व काही सहन करेल, असा समज करून कोणी नाटक करत असेल, तर त्या नाटकाचा तमाशा कसा करायचा, हे लोकांना दाखवून देण्याचे काम मी करेन," असेही ते म्हणाले.
तर "ज्यांची पापे असतील, ती त्यांच्याकडेच राहू द्या. आमचे हात आणि मन दोन्हीही पूर्णपणे स्वच्छ आहेत. माझा कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक वाद नाही. कोणाचाही अपमान करण्याची किंवा कोणाच्याही राजकीय अथवा वैयक्तिक जीवनात वाईट घडावे, अशी माझी इच्छा नाही," असेही नाईक यांनी स्पष्ट केले.
मात्र "कोणी आम्हाला बुद्धू समजून आमच्या डोक्यावर टपली मारण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा हात धरून त्याला त्याची लायकी दाखवून देण्याची ताकद आमच्या मनगटात आहे," असा आक्रमक इशाराही त्यांनी दिला आहे.
नवी मुंबईत राजकीय वातावरण तापणार
नाईक यांनी भाषणात कोणाचेही थेट नाव घेतले नसले, तरी त्यांच्या वक्तव्याचा रोख एकनाथ शिंदे यांच्या दिशेने असल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यूडीसीपीआर आणि क्लस्टरच्या मुद्द्यांवरून दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय मतभेद असल्याच्या पार्श्वभूमीवर नाईक यांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे. त्यामुळे आगामी काळात नवी मुंबईतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.