

Marathwada Politics : सध्या मराठवाड्यात जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी येथील जिल्हा बँकांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. यापैकी छत्रपती संभाजीनगर आणि परभणी येथे नव्या संचालक मंडळासह अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीदेखील झाल्या आहेत.
शेतकरी, सभासदांचे हित जपण्यासाठी आम्ही जिल्हा बँकेमध्ये राजकीय जोडे बाहेर ठेवून येतो, इथे कुठल्याच प्रकारच्या राजकारणाला थारा नाही, अशी भाषणे ठोकणारे नेते प्रत्यक्षात मात्र सत्ता आणि महत्त्वाच्या पदावर मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण किंवा इतर नातेवाईकाला बसवण्यासाठीच प्रतिष्ठा पणाला लावतात.
राज्याच्या सहकार क्षेत्रावर काँग्रेसचा कायम प्रभाव राहिला आहे. मोठमोठे नेते, सहकार महर्षी याच पक्षातून निर्माण झाले. पण राजकारणातील घराणेशाही आणि नात्यागोत्याला सत्तेत बसवण्याची परंपरादेखील याच पक्षाने राजकारणात दृढ केली. आता याच वाटेवर सत्तेत असलेली महायुती जात असल्याचे चित्र आहे. अर्थात, यामागे काँग्रेससह इतर पक्षांतून सत्ताधारी भाजपमध्ये झालेल्या मोठ्या प्रमाणातील इनकमिंगचाही परिणाम असल्याचे बोलले जाते.
खासदार, आमदार पुत्र झाले बँकेचे अध्यक्ष..
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांचे आमदार पुत्र विलास भुमरे यांची निवड करण्यात आली आहे. तर जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांचे सुपुत्र राहुल लोणीकर यांची वर्णी लागली आहे.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर चौदा वर्षांपूर्वी घोटाळ्याचे आरोप झाल्यामुळे पायउतार व्हावे लागलेले माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर पुन्हा अध्यक्ष झाले. पालकमंत्री कन्या मेघना बोर्डीकर यांनी त्यांच्यासाठी आपले वजन वापरले. नांदेड जिल्हा बँकेवरही महायुतीची सत्ता आली आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात महायुतीने 23 पैकी 21 जागा जिंकल्या आहेत. या बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड येत्या 10 तारखेला होणार आहे. इथेही अशोक चव्हाण हे आपल्या समर्थकांची वर्णी लावण्याच्या तयारीत आहेत.
मराठवाड्यातील सर्वात यशस्वी आणि नफ्यात असलेली बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आमदार अमित देशमुख यांचे बंधू, माजी आमदार धीरज देशमुख हे अध्यक्ष आहेत. तर धाराशीव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार बसवराज पाटील यांचे बंधू बापूराव पाटील हे विराजमान आहेत. केवळ अध्यक्ष, उपाध्यक्षच नाही, तर बँकेच्या संचालक मंडळातही या मंडळींनी नातेवाईकांची वर्णी लावलेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.