Kunbi Shivseva Leader & Sunil Tatkare Sarkarnama
कोकण

Konkan News : श्रीवर्धनमध्ये ७० टक्के कुणबी असूनही तटकरेंना ४० हजारांचा लीड कसा मिळतो? : कुणबी शिवसेवाचा सवाल

अनंत गीते ६ वेळा खासदार म्हणून निवडून आले आणि ४ वेळा केंद्रीय मंत्री झाले. कुणबी समाजाचा किती विकास झाला ते प्रथम सांगा.

सरकारनामा ब्यूरो

खेड (जि. रत्नागिरी) : महाराष्ट्रात कुठेच समाजात वाद पेटवला जात नाही; पण दुर्दैवाने तसा प्रयत्न कोकणात काही लोकांकडून येथे होताना दिसतो आहे, अशी खंत कुणबी शिवसेवा संघ खेडचे अध्यक्ष वसंत शिगण यांनी खेड येथे व्यक्त केली. (How can Sunil Tatkar get a lead of 40 thousand despite 70 percent Kunbi in Srivardhan? : Kunbi Shivseva)

शिगण म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये कुणबी आणि मराठा असा वाद कुठेच पेटवला जात नाही. मात्र, कुणबी समाजामधील काही राजकीय नेते झोपताना पण जॅकेट घालून झोपत आहेत अन् आमदारकीची राजकीय स्वप्न पाहत आहेत. वैयक्तीक स्वार्थापोटी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक या लोकप्रतिनिधींकडून होत आहे. यामागचा खरा सुत्रधार कोण आहे याची जाणीव समाजाला आहे.

ते म्हणाले की, यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुणबी समाजाचे सहा आमदार होते, त्या वेळी कुणबी समाजाच्या वाड्यांचा किती विकास झाला ते सांगा? अनंत गीते ६ वेळा खासदार म्हणून निवडून आले आणि ४ वेळा केंद्रीय मंत्री झाले. कुणबी समाजाचा किती विकास झाला ते प्रथम सांगा. अनंत गीते यांच्या लोकसभा मतदार संघात ७० टक्के कुणबी समाज असतानादेखील ज्यांचा ३ टक्केदेखील समाज नाही, असे सुनील तटकरे कसे निवडून येतात ते सांगा.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामध्ये ७० टक्के कुणबी समाज असताना ४० हजारांचा लीड सुनील तटकरे यांना कसा मिळतो? दापोली येथील काही कुणबी समाजाच्या नेत्यांनी अनंत गीते यांना पाडण्यासाठी तटकरे यांचे उघडपणे काम केले. मग कुणबी समाजानेच अनंत गीते यांना का पाडलं? असा सवाल शिगण यांनी केला.

शिवसेना तालुकाप्रमुख धाडवे म्हणाले की, योगेश कदम यांच्यासारखा तरुण तडफदार, सुशिक्षित व सौम्य स्वभावाने सर्व समाजाच्या लोकांना विश्वासात घेऊन कुणबी समाजाच्या वाडीवस्तीचा विकास करणारा आमदार नेमका का नको ते कुणबी समाजाच्या नावाने बातम्या देणाऱ्यांनी सांगावे आणि मागील २० वर्षापासून दापोली मतदार संघामधील कुणबी समाजाची सामाजिक बांधिलकी सोडून फक्त शिवसेनेच्या आमदाराला पाडण्याचे कुणबी समाजाचे जातीय राजकारण का केले जाते? कुणबी समाज आता अशिक्षित राहिला नाही. समाजाच्या नावाने ब्लॅकमेलिंग करून समाजाची कुठलीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कोणीही साथ देणार नाही.

कुणबी समाजाला उमेदवारी देणाऱ्यालाच पाठिंबा

दाभोळ : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभा झाल्या. या राजकीय घडामोडीनंतर आता कुणबी समाजदेखील राजकीयदृष्ट्या एकवटू लागल्याचे पाहायला मिळत आहे. जो पक्ष कुणबी समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षाच्यामागे कुणबी समाज खंबीरपणे उभा राहील, असा निर्धार दापोली विधानसभेतील कुणबी समाजाने केला आहे.

मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ व कुणबी समाजोन्नती संघ शाखा मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २६) दुपारी ३ वाजता नालासोपारा येथे कुणबी समाज राजकीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत दापोली, खेड, मंडणगड तालुक्यातील कुणबी समाजाचे संघटन करणे, कुणबी समाजाची राजकीय दिशा ठरवण्यात येणार आहे. समस्त कुणबी संघटना, संस्था, मंडळे, पतपेढ्यांना या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोकणामध्ये असणारा मोठ्या संख्येतील कुणबी समाज हळूहळू एकवटू लागला आहे. हे मुंबई दादर या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मेळाव्याने स्पष्ट केले आहे. दापोली-खेड-मंडणगड तालुक्यामधील कुणबी समाजाचे संघटन करणे, कुणबी जोडो अभियान राबवणे आणि कुणबी समाजाची राजकीय दशा आणि दिशा अशा तीन विषयांवरील चर्चासत्राने हा मेळावा पार पडला होता.

कुणबी समाजाच्या तब्बल २२ विविध संघटनांनी मेळाव्यामध्ये सहभाग घेतला होता. या वेळी देखील कुणबी समाजाचा उमेदवार हा दापोली विधानसभेचा असला पाहिजे तसेच जो पक्ष कुणबी समाजाचा उमेदवार देईल त्याच्यापाठी आम्ही ठामपणे उभे राहू, असा निर्धार सर्व कुणबी बांधवांनी केला होता. त्या पद्धतीने दापोली विधानसभेतील प्रत्येक गावोगावी कुणबी बांधवांनी सभा घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT