Narayan Rane-Manoj Jarange Patil Sarkarnama
कोकण

Manoj Jarange Patil : फडणवीस अन्‌ भाजप नेत्यांवर बोलाल तर आम्हीही उत्तर देणार; नारायण राणेंचा जरांगे पाटलांना इशारा

Vijaykumar Dudhale

Ratnagiri, 04 August : मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील येत्या बुधवारपासून (ता. 07 ऑगस्ट) पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. सोलापूरमधून त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा प्रारंभ होणार आहे. एकीकडे जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रात येत असताना माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हेही लवकरच मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

तसेच मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या भाजप नेत्यांवर बोलू नये, ते आमच्या नेत्यांवर बोलले तर आम्हीही त्यांना उत्तर देणार, असा इशारा राणे यांनी दिला आहे. त्यामुळे मराठवाड्यात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाच्या महाअधिवेशनानंतर खासदार नारायण राणे (Narayan Rane) हे माध्यमांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, मराठवाड्यात जाती-जातीमध्ये भेदभाव निर्माण केला गेला आहे. दोन समाजात भांडणं लावण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे मी लवकरच मराठवाड्याचा दौरा करणार आहे.

मराठवाड्यातील दोन समाजामध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन जातींमध्ये भेदभाव निर्माण केला गेला आहे. ते सामाजिक वातावरण सुधारण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न राहणार आहे. आमच्या भाजप नेत्यांबद्दल मनोज जरांगे पाटील वाटेल तसे बोलत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या अन्य नेत्यांवर बोलू नये. त्यांच्यावर बोलले तर आम्ही जरांगे पाटील यांना त्या शब्दांत उत्तर देऊ, असाही इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत घडलेल्या प्रकाराची मला माहिती आहे. पण, माझी भावना सुडाची नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा जागांबाबत मी काहीही बोलणार नाही. कोणीही दावे करतील. पण, आपल्याला पुन्हा महायुतीची सत्ता आणायची आहे, त्यामुळे हेवेदावे बाजूला ठेवून काम करावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत समंजसपणा दाखवून चांगले निकाल आणून दाखवू, असा विश्वासही खासदार नारायण राणेंनी बोलून दाखवला.

मुस्लीम समाजाने लोकसभा निवडणुकीत विरोधात केलेल्या मतदानाबाबत नारायण राणे यांनी भाष्य केले. काही लोकांनी गैरसमज पसरवले आहेत. आम्ही कधीही जातीभेद केलेला नाही. मुस्लीम बांधवांनही सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. सरकारने गेल्या दहा वर्षांत विविध विकास कामे केली आहेत. विविध योजना या सरकारने दिल्या आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, अन्नधान्य, लाडकी बहीण योजना, महिलांना प्रवासात सूट आदी योजनांचा यामध्ये समावेश आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला दिलासा मिळाला. पण, रत्नागिरी जिल्ह्यात जाणवला नाही, तो आता यापुढे जाणवेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT