खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांडावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.
शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या आरोपांनंतर सुनील तटकरे यांनी थेट कायदेशीर नोटीस बजावली आहे.
समाधानकारक उत्तर न दिल्यास बदनामीचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही तटकरेंनी दिला आहे.
mangesh kalokhe murder case News : खोपोलीतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची हत्या 26 डिसेंबर रोजी सकाळी करण्यात आली होती. काळोखे यांची हत्या सुपारी देऊनच करण्यात करण्यात आली होती. तर या हत्येचा मास्टरमाईंड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भरत भगत असल्याचे आता तपासात समोर आले आहे. तर या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पण या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या हत्येमागचा आका सुतारवाडीत आहे म्हणत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर आरोप केला होता. आता हेच आरोप त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता असून तटकरे अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी थोरवेंना थेट बदनामीची नोटीस धाडली आहे. यामुळे आता तब्बल ४० दिवसांच्यानंतर खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे मंगेश काळोखे हे कट्टर समर्थक होते. काळोखे यांच्या हत्याकांडानंतर थोरवे यांनी खळबळ उडवून देणारे आरोप केले होते. त्यांनी, 'मंगेश यांची हत्या कटकारस्थान करून करण्यात आली आहे. यासाठी हल्लेखोरांना 20 लाख रुपयांची नव्हे, तर एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. हल्लेखोर हे मुख्य आरोपी रवींद्र देवकर याच्या कार्यालयात लपून होते,' असा गंभीर आरोप थोरवे यांनी केला होता.
काळोखे यांच्या हत्याकांडा मागचा आका सुतारवाडीत असल्याचा आरोप करताना तटकरे हे रायगड जिल्ह्याचे आका असल्याचा दावा करत थोरवे यांनी तटकरेंसह राष्ट्रवादीला लक्ष्य केलं होतं. तर या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार (प्लॅनर) सुधाकर घारे असून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. तर काळोखे यांच्या हत्येचा कट तटकरे यांच्या सुतारवाडीतील निवासस्थानी रचण्यात आला, असा दावा थोरवे यांनी केला होता.
लोकशाही पद्धतीने आतापर्यत सगळ्या निवडणुकांना आपण सामोरे गेलो. पण सुनील तटकरे रायगडमध्ये सत्तेत आल्यापासून येथे रक्तरंजित राजकारण सुरु आहे. बीडनंतर आता रायगडचे आका तटकरे झाले आहेत. तटकरेंच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना मारण्यात येत आहे. आजही सुधाकर घारे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बैठका घेत आहेत. सुधाकर घारेचा याच्यामध्ये हात नाही असं सुनील तटकरे सांगत आहेत.
या प्रकरणाचा त्यांनी तपास केला आहे का? याचा अर्थ हे सगळं पूर्वनियोजित आहे. सुधाकर घारे एफआयआरमधला आरोपी आहे. ही घटना घडण्याच्या दोन दिवस आधी रवी देवकर सरकारी वकिलांच्या मार्फत सुतारवाडीला गेला होता. तिथे सुनील तटकरेंसोबत बसून, चर्चा करुन नियोजितपणे काळोखेंची हत्या करण्यात आली असाही दावा थोरवे यांनी केला होता. ज्यानंतर रायगडच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता.
या सर्व आरोप आणि दाव्यांच्यानंतर तटकरे अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी थोरवे यांच्या विरोधात थेट कायदेशीर पाऊल उचलले आहे. थोरवे यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये करण्यात आलेल्या आरोपांबाबत थोरवे यांनी समाधानकारक उत्तर द्यावे असे म्हटलं आहे. शिवाय ठराविक कालावधीत उत्तर न दिल्यास आमदार थोरवे यांच्या विरोधात बदनामीचे गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
1. खोपोलीतील मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरण काय आहे?
खोपोलीत घडलेल्या या हत्याकांडावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
2. सुनील तटकरे यांनी कोणावर कायदेशीर कारवाई केली आहे?
शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांना त्यांनी नोटीस बजावली आहे.
3. नोटीसमध्ये तटकरेंनी काय मागणी केली आहे?
आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत समाधानकारक उत्तर देण्याची मागणी केली आहे.
4. उत्तर न दिल्यास काय होऊ शकते?
महेंद्र थोरवे यांच्या विरोधात बदनामीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
5. हे वक्तव्य कुठे करण्यात आले?
कर्जत येथील निवडणूक प्रचार सभेनंतर सुनील तटकरे यांनी हे वक्तव्य केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.