आंबा आणि काजू बागायतदारांच्या आंदोलनानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला.
विमा न काढलेल्या शेतकऱ्यांनाही हेक्टरी 22 हजार रुपयांची मदत जाहीर.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अधिकृत घोषणा केली.
kokan farmers protest : कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईवरून नांदगाव येथील महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला होता. या प्रकरणी राजू शेट्टींसह ३७ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. यानंतर शेट्टी यांनी बागायतदारांबाबत योग्य निर्णय न झाल्यास मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक देवू असा इशारा दिला होता. या आंदोलनानंतर आता कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.२५) विधानसभेत केली. ज्या फळपीक उत्पादकांनी विमा काढला नाही, त्यांना हेक्टरी २२ हजार रुपये मदत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
कोकणातील आंबा, काजू पिकांचे ७५ ते ९० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोकणातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या संदर्भात १२ मार्चला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा, तर २३ मार्चला नांदगाव येथे हजारो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले होते. आंबा पिकाला हेक्टरी पाच लाख, तर काजू पिकाला हेक्टरी तीन लाख रुपये मिळावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी होती.
त्यांनी, सरकारने बागायतदारांना अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसान भरपाई मदत जाहीर केली नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक देणारच असा एल्गार केला होता. तसेच पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यावरून संपात व्यक्त करताना, अशा गुन्ह्यांना आम्ही भीत नाही, भीक घालतच नाही. अजून तुम्ही गुन्हे दाखल कराल, लाठ्या चालवाल, गोळ्या घालाल, तरी आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला होता.
यादरम्यान आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी (ता.२५) विधानसभेत कोकणातील आंबा, काजू बागायतदारांना मदतीचे पॅकेज जाहीर केले. यात विमा काढलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४२ हजार, तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रुपये मदत दिली जाणार आहे. तत्पूर्वी नुकसानीचे पंचनामे कृषी विभागातर्फे केले जाणार आहेत. नुकसानीचा अंतिम अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार असून, मागील वेळेपेक्षा वाढ करून यंदा सुमारे २२ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्याचा शासनाचा मानस असल्याची घोषणा फडणवीस यांनी विधानसभेत केली.
यावेळी ते म्हणाले, हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे ज्या फळपीक उत्पादकांनी विमा काढला नाही, त्यांना मदत केली जाईल. जी हेक्टरी २२ हजार रुपये असेल. तर विमा संरक्षित केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४२ हजार रुपये मिळतील. ते अंतिम आठवडा प्रस्तावासह अन्य प्रस्तावांवर उत्तर देताना बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी आंबा आणि काजूसह धान उत्पादकांनाही बोनस देण्यात येईल. त्यासंबंधीची कार्यपद्धती निश्चित करण्यात येत असल्याचे सांगितले.
पण आता या घोषणेनंतर कोकणातील शेतकऱ्यांची धुसफूस सुरू झाली असून एकीकडे राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे हे शक्य झाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत. तसेच ही तुटपुंजी मदत आम्हाला मान्य नसून शासनाने कोकणातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे, अशी टीका आंदोलनाचे नेतृत्व करणारे राजू शेट्टी यांनी केली आहे.
बागायदारांची क्रूर चेष्टा : शेट्टी
राज्यासह कोकणातील आंबा, काजू बागायतदारांनी पहिल्यांदाच शासनाकडे आंब्याला हेक्टरी पाच लाख, तर काजूला तीन लाख रुपयांची मागणी केली होती; परंतु राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत म्हणजे 'उंटाच्या तोंडात जिरे' अशीच आहे. ही तुटपुंजी मदत जाहीर करून सरकारने आंबा बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळले. कोकणातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली. शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे उद्ध्वस्त झाला असताना अशी मदत जाहीर करून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली अशीही टीका त्यांनी केली आहे.
1. आंबा आणि काजू बागायतदारांना किती भरपाई मिळणार?
➡️ हेक्टरी 22,000 रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.
2. ही मदत कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल?
➡️ ज्यांनी पीक विमा काढलेला नाही अशा बागायतदारांनाही मदत मिळेल.
3. आंदोलन कुठे झाले होते?
➡️ नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
4. या निर्णयामागे कोणाचे आंदोलन होते?
➡️ शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले होते.
5. मदत कधी मिळणार?
➡️ सरकारच्या प्रक्रियेनंतर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.